स्वच्छतेच्या सेवेसाठी १ ऑक्टोबरला जिल्ह्यात ‘एक तास _ एक साथ’
‘स्वच्छता ही सेवा’ अभियानात अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी, महिला बचत गट, युवकांसह नागरिकांचा सहभाग

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
‘स्वच्छता ही सेवा–२०२६’ अभियानांतर्गत ‘एक दिवस _ एक तास _ एक साथ’ या उपक्रमाचे आयोजन बुधवार, १ ऑक्टोबर रोजी जिल्हाभर करण्यात येणार आहे. सकाळी एक तास सामूहिक श्रमदान करून गावागावातील सार्वजनिक परिसर स्वच्छ करण्यासोबतच स्वच्छतेचा संदेश जनमानसात रुजविण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
ग्रामपंचायत स्तरावर सार्वजनिक ठिकाणे, शाळा परिसर, रस्ते, चौक, जलस्रोत परिसर तसेच आवश्यक ठिकाणी सामूहिक श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. कचऱ्याचे योग्य वर्गीकरण, कचरा व्यवस्थापन आणि परिसर स्वच्छ ठेवण्याबाबतही नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.
या मोहिमेत अधिकारी-कर्मचारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला बचत गट, युवक, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी केले आहे.
“स्वच्छता ही केवळ एका दिवसापुरती मर्यादित न राहता प्रत्येक गावाची आणि प्रत्येक नागरिकाची दैनंदिन जबाबदारी झाली पाहिजे. १ ऑक्टोबर रोजी प्रत्येकाने किमान एक तास स्वच्छतेसाठी दिल्यास लोकसहभागातून स्वच्छ, सुंदर आणि निरोगी गावांची निर्मिती अधिक प्रभावीपणे करता येईल,” असे आवाहन पुलकित सिंह यांनी केले आहे.
– १ ऑक्टोबर रोजी जिल्हाभर सामूहिक श्रमदान.
– ‘एक दिवस, एक तास, एक साथ’ उपक्रम.
– सार्वजनिक ठिकाणे, शाळा, रस्ते व जलस्रोत परिसराची स्वच्छता.
– कचरा वर्गीकरण व स्वच्छतेबाबत जनजागृती.
– अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी, महिला बचत गट, युवक व नागरिकांचा सहभाग अपेक्षित.



