जागतिक रेबीज दिनानिमित्त ५४ पाळीव प्राण्यांचे मोफत रेबीज लसीकरण
पशुवैद्यकीय दवाखाना व नगरपंचायतचा संयुक्त उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ जागतिक रेबीज दिनानिमित्त पशुवैद्यकीय दवाखाना गोंडपिपरी व नगरपंचायत गोंडपिपरी यांच्या संयुक्त विद्यमाने नगरपंचायत कार्यालय परिसरात पाळीव प्राण्यांसाठी रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. पाळीव प्राण्यांच्या आरोग्याचे संरक्षण तसेच नागरिकांना रेबीजसारख्या जीवघेण्या आजारापासून सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्ष अश्विनी तोडासे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी विवेक चौधरी, डॉ. बी. एस. रामटेके (सहाय्यक आयुक्त) यांच्यासह पशुसंवर्धन विभागाचे डॉ. टी. एस. झाडे (पशुधन विकास अधिकारी), डॉ. पी. जे. बर्गे, डॉ. संदीप फरकाडे, गुरुदास मडावी (पशुधन पर्यवेक्षक), परिचर विनोद झोडगे व प्रवीण टेंभुर्णे उपस्थित होते.
या शिबिरामध्ये ५१ पाळीव कुत्रे व ३ पाळीव मांजरे, अशा एकूण ५४ पाळीव प्राण्यांना रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले. उपस्थित पशुपालकांना रेबीज प्रतिबंध, पाळीव प्राण्यांची नियमित लसीकरणाची आवश्यकता, स्वच्छता व जबाबदार पशुपालन याबाबत मार्गदर्शनही करण्यात आले.
सदर शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी नगरपंचायत गोंडपिपरीचे शहर समन्वयक नागेश सदावर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी नगराध्यक्ष अश्विनी तोडासे यांनी नागरिकांनी आपल्या पाळीव प्राण्यांचे नियमित लसीकरण करून रेबीजमुक्त समाज घडविण्यास सहकार्य करावे, असे आवाहन केले. मुख्याधिकारी विवेक चौधरी यांनीही नागरिकांनी अशा जनजागृतीपर उपक्रमांचा लाभ घेऊन पाळीव प्राण्यांच्या आरोग्याबरोबरच संपूर्ण कुटुंबाच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी,असे सांगितले.



