समान कामासाठी समान वेतन लागू करा
राज्य शासकीय, निमशासकीय व जि.प. वाहनचालकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
राज्य शासकीय, निमशासकीय तसेच जिल्हा परिषद आस्थापनेवरील वाहनचालकांच्या वेतनातील तफावत दूर करून समान कामासाठी समान वेतनाचे तत्त्व लागू करावे, या प्रमुख मागणीसाठी राज्य शासकीय, निमशासकीय व जिल्हा परिषद वाहन चालक वर्ग-3 कर्मचारी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी वान्मथी सी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांना निवेदन देण्यात आले.
वाहनचालक हे केवळ वाहन चालविणारे कर्मचारी नसून शासकीय यंत्रणेच्या दैनंदिन कामकाजातील महत्त्वाचा घटक आहेत. पूर, अतिवृष्टी, वादळ, भूकंप, दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती तसेच कोरोना महामारीसारख्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षेशी संबंधित कामांमध्ये वाहनचालकांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे. त्यामुळे त्यांच्या कामाचे स्वरूप व जबाबदारी लक्षात घेऊन वेतनाबाबत समान धोरण असावे, अशी मागणी संघटनेने केली आहे.
राज्यातील विविध शासकीय विभागांमध्ये कार्यरत वाहनचालकांचे काम मूलतः समान स्वरूपाचे असतानाही त्यांच्या वेतनश्रेणीत तफावत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शासन निर्णय, वेतन आयोगाच्या शिफारशी तसेच उच्च न्यायालयाच्या निर्णयांचा विचार करून वाहनचालकांना समान वेतनश्रेणी व कालबद्ध पदोन्नती योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात मुंबई उच्च न्यायालयातील वाहनचालकांना लागू असलेल्या वेतनश्रेणीच्या धर्तीवर राज्यातील संबंधित शासकीय आस्थापनांमधील वाहनचालकांना वेतनश्रेणी लागू करावी, तसेच वेतन आयोगातील एस-१० वेतनश्रेणी ‘समान काम समान वेतन’ या तत्त्वानुसार लागू करून त्यानुसार सर्व लाभ मंजूर करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.वाहनचालकांच्या कामाचे स्वरूप, जबाबदाऱ्या आणि सेवाकालाचा विचार करून वेतनातील विसंगती दूर करावी, अशी मागणी संघटनेने निवेदनातून केली.
जिल्हाधिकारी वान्मथी सी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांच्याकडे निवेदन सादर करून या मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही करण्याची विनंती करण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष विजय चिंचोळकर, सचिव ज्ञानेश्वर शा. वावडेकर, तसेच वाहनचालक शुभम महत्वानी, किशोर गोहणे, ओम उमाटे, नदीम शेख, वैभव सेलोटकर यांच्यासह इतर वाहनचालक उपस्थित होते.



