भंगाराम तळोधीत आज महाराजस्व समाधान व मोफत आरोग्य तपासणी शिबिर
भटके-विमुक्त जमातींसाठी विशेष लाभ वाटप अभियान ; विविध शासकीय योजना व आरोग्यसेवा एकाच छताखाली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ तालुक्यातील नागरिकांना विविध शासकीय योजना व सेवांचा थेट लाभ मिळावा, तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी करून आवश्यक आरोग्य मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने आज (२९ सप्टेंबर २०२६) रोजी भंगाराम तळोधी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत महाराजस्व समाधान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच भटके व विमुक्त जमातीसाठी विशेष लाभ वाटप अभियान राबविण्यात येणार असल्याने नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तहसील कार्यालय गोंडपिपरीच्या पुढाकारातून आयोजित ‘महाराजस्व समाधान शिबिर अभियान’ अंतर्गत नागरिकांना विविध शासकीय योजना व सेवांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन आणि आवश्यक प्रक्रिया करून देण्यात येणार आहे.
या शिबिरात आधार कार्ड, नवीन मतदार नोंदणी व ओळखपत्र, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, आयुष्यमान कार्ड, पीएम किसान योजना, श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजना, संजय गांधी निराधार योजना, प्रधानमंत्री आवास योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तसेच शिक्षणपत्रिका आदी सेवांबाबत नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र नागरिकांनी तसेच आरोग्य तपासणीसाठी नागरिकांसोबतच विद्यार्थ्यांनी या संयुक्त शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी आकाश वर्मा, तहसीलदार शुभम बहाकर, डॉ. पराग जवळे, गटशिक्षणाधिकारी दामिनी महाजन यांच्यासह तालुका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
*भटके-विमुक्तांसाठी विशेष अभियान*
शासकीय योजनांपासून अनेकदा वंचित राहणाऱ्या भटके व विमुक्त जमातीतील नागरिकांपर्यंत योजनांचा लाभ थेट पोहोचविण्यासाठी विशेष लाभ वाटप अभियानाला या उपक्रमात महत्त्व देण्यात आले आहे. पात्र नागरिकांना उपलब्ध शासकीय योजना, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया आणि लाभ मिळविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित समाजातील नागरिकांनी आपली आवश्यक कागदपत्रे घेऊन शिबिरात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
*विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी*
आरोग्य विभाग व शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिरही याच ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची सामान्य आरोग्य तपासणी, रक्तदाब, रक्तातील साखर, डोळे, दात तसेच इतर आवश्यक आरोग्य तपासण्या करण्यात येणार आहेत. आरोग्यविषयक समस्या आढळल्यास आवश्यक मार्गदर्शन व पुढील उपचाराबाबत सूचना देण्यात येणार आहेत. या उपक्रमासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पराग जवळे व गटशिक्षणाधिकारी दामिनी महाजन यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.



