ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विशेष अभियानातून विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या नागरिकांना दाखले व योजनांचा लाभ – जिल्हाधिकारी वान्मथी सी

विजाभज प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी विशेष शिबिर ; जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंगणवाडीस भेट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने पिक पाहणी ;  आर्वी उपसा सिंचन प्रकल्पास भेट व आढावा

वर्धा : सेवा संकल्प अभियानांतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिकांना जात, उत्पन्न, अधिवास प्रमाणपत्रासह आवश्यक दाखले देण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित करण्यात येत आहे. या शिबिरातून पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. एकही पात्र व्यक्ती लाभापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी सांगितले.

सेवा संकल्प अभियानांतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिकांना विविध शासकीय योजनांच्या लाभासाठी आवश्यक दाखले उपलब्ध करून देण्यासाठी आर्वी तालुक्यातील धनोडी येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे जिल्हाधिकारी बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना त्यावर तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले.

यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी धनोडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडीस भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शाळेचा पाणीपुरवठा, आहार, स्वच्छता, शैक्षणिक सुविधांची पाहणी करून अडचणी जाणून घेतल्या व संबंधित अधिकारी यांना उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी धनोडी येथील निम्न वर्धा प्रकल्पास भेट दिली. यावेळी त्यांनी आर्वी उपसा सिंचन योजनेच्या कामाचा संबंधित अधिकारी यांच्यामार्फत आढावा घेतला. संबंधित यंत्रणेस कामाची गती वाढवून काम लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

दुष्काळी परीस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आर्वी तालुक्यातील बहादुरपूर (खुबगाव) येथील देवराव पांडूजी कांबळे यांच्या शेतातील सोयाबिन पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधत कापूस, तूर व सोयाबिन पिकांची सद्यस्थिती तसेच पाण्याच्या उपलब्धतेबाबत माहिती घेतली. गेल्यावर्षीप्रमाणे सोयाबिनचे पिक पुर्णपणे नष्ट झाल्याचे शेतकऱ्यानी सांगितले. गेल्या तीन वर्षांपासून सोयाबीन, तूर, कापूस या पिकांचे उत्पन्न सरासरीपेक्षा फारच कमी झाले असल्याचे शेतकरी म्हणाले.

यावेळी उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाट, तहसिलदार हरीश काळे, गटविकास अधिकारी शिवशंकर इंगोले, तालुका कृषि अधिकारी रविंद्र उघडे, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसेवक आदी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये