पोंभूर्णा येथे गणेश विसर्जनाला लागले गालबोट
२१ लोकांवर गुन्हे दाखल ; काही काळ तणाव ; पोलिसांनीच लाठी चार्ज केल्याचा मंडळाचा आरोप
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
पोंभूर्णा :- शहरातील गणेश विसर्जना दरम्यान गालबोट लागले असल्याची घटना दि.२८ सप्टेंबरला रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली.विसर्जन मिरवणुकीदरम्यान पोलीस आणि विघ्नहर्ता गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याने काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली.शाब्दिक बाचाबाचीचं रूपांतर धक्काबुक्कीत झाल्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला.या कारवाईनंतर संतप्त झालेल्या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांसह गणेशभक्तांनी शहरातील सावित्रीबाई फुले चौकात काही वेळ ठिय्या आंदोलन सुरू केले होते.
पोंभूर्णा शहरातील दोन्ही गणेश विसर्जन सोमवारला ठेवण्यात आले होते.शिवाजी चौकात विघ्नहर्ता गणेश मंडळाच्या सदस्यांना पोलिसांनी समोर जाण्यासाठी घाई केले असल्याने मंडळाचे सदस्य व पोलिसांमध्ये बाचाबाची झाली.त्याचे रुपांतर सोम्य लाठीचार्ज मध्ये झाले.त्यामुळे संतप्त झालेल्या मंडळाच्या सदस्यांनी लाठी चार्ज करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी रेटून धरली.या दरम्यान काही काळ तणाव सदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती.
मंडळाच्या सदस्यांनी लाठी चार्ज करणाऱ्या पोलिसांवर जोपर्यंत कारवाईचे लेखी आश्वासन मिळणार नाही तोपर्यंत आम्ही सावित्रीबाई फुले चौकातून उठणार नाही अशी भूमिका घेत ठिय्या दिला.दरम्यान प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता पोंभूर्णा शहरात मोठा पोलीस बंदोबस्त आणि दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले होते. घटनास्थळी अप्पर पोलीस अधिक्षक दाखल होत परिस्थितीवर नियंत्रण ठेवले. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या घडामोडींनंतर पोलीस बंदोबस्तात व मंडळाचे अध्यक्ष व सदस्यांच्या वतीने गणपतीचे विसर्जन करण्यात आले.
या प्रकरणी वाद घालणाऱ्या २१ लोकांवर रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्यात आले.त्यापैकी १४ लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.तर ७ फरार आहेत त्यांचेवर म.पो.अधिनियम १९५१ नुसार कलम १३६,३८ तसेच महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ नुसार ८५ (१) तसेच भारतीय न्याय संहिता कलम १२६(२), १८९(२),१८९(३),२२३,४९ व १३२ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.मंगळवारला १४ लोकांना मुल न्यायालयात हजर करण्यात आले.
सदर घटनेचा पुढील तपास सहा.पोलिस निरिक्षक राहुल ठेंगणे करीत आहेत.



