घुग्घुस नगर परिषद प्रभाग क्रमांक ३ मध्ये रस्त्यावर साचलेल्या सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त, सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल!
नगराध्यक्ष, उपाध्यक्ष आणि नगरसेविकांनी तातडीने लक्ष देण्याची मागणी ; कच्ची नाली तयार करून मुरूम टाकण्याद्वारे तात्पुरता दिलासा देण्याचे आवाहन
चांदा ब्लास्ट
घुग्घुस, चंद्रपूर : घुग्घुस नगर परिषद अंतर्गत प्रभाग क्रमांक ३ मध्ये रस्त्यावर सांडपाणी साचत असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते विजय माथनकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्टर शेअर केले असून, सध्या हे पोस्टर घुग्घुसमधील काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चर्चेचा विषय बनले आहे.
या पोस्टरच्या माध्यमातून त्यांनी नगराध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संबंधित नगरसेविकांनी या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे. रस्त्यावर सांडपाणी साचत असल्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले तसेच सर्वसामान्य पादचाऱ्यांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
नागरिकांना दररोज भेडसावणाऱ्या या समस्येतून सुटका कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नगर परिषद प्रशासन आणि संबंधित लोकप्रतिनिधींना या समस्येची माहिती आहे का? की नागरिकांच्या तक्रारी आणि सोशल मीडियावरील पोस्टनंतरच या समस्येकडे लक्ष दिले जाणार, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
तात्पुरता दिलासा मिळावा यासाठी रस्त्याच्या कडेला कच्ची नाली तयार करून सांडपाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था करावी, तसेच आवश्यकतेनुसार रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये मुरूम टाकून रस्ता वाहतुकीसाठी सुयोग्य करावा, अशी मागणी विजय माथनकर यांनी केली आहे. यासोबतच या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचेही आवाहन त्यांनी केले आहे.
विशेष म्हणजे, नगर परिषदेचे काम केवळ मोठ्या विकासकामांपुरते आणि घोषणांपुरते मर्यादित नसून, नागरिकांना स्वच्छ रस्ते, योग्य सांडपाणी निचरा आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हीदेखील स्थानिक प्रशासनाची जबाबदारी आहे.
आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या पोस्टरची आणि नागरिकांच्या मागणीची नगराध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच संबंधित नगरसेविका किती लवकर दखल घेतात आणि प्रभाग क्रमांक ३ मधील नागरिकांना या दैनंदिन समस्येतून कधी दिलासा मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



