ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सुखी जीवनाचा मार्ग धम्मात, समाधान आणि सन्मानाने जगण्याची कला धम्म शिकवतो – आ. जोरगेवार

वर्षावास काळात उपासथ व्रताचे पालन करणार्या उपासक-उपासिकांचा भाजप महानगर कार्यालयात सन्मान, भंते धम्मघोष मेहता व संघाची विशेष उपस्थिती

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ माणसाकडे कितीही संपत्ती, साधनसंपत्ती आणि सुखसोयी असल्या तरी तो खर्या अर्थाने सुखी असेलच असे नाही. कारण सुख हे बाह्य गोष्टींमध्ये नसून ते शोधण्याची दृष्टी आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन यात असते. जीवनात समाधानी राहण्याची कला आणि मनःशांतीचा मार्ग धम्म शिकवतो. वर्षावास काळात उपासथ व्रताचे पालन करताना आपण आपल्या चित्ताचे शुद्धीकरण करतो. चांगले विचार मनात रुजण्यासाठी शरीर आणि मनाचे शुद्धीकरण आवश्यक आहे, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

              भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या वतीने महानगर कार्यालयात वर्षावास काळात उपासथ व्रताचे पालन करणार्या उपासक आणि उपासिकांच्या सन्मान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भंते धम्मघोष मेहता व संघाची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थितांना संबोधित करताना धम्म, मानवता, समाधान आणि सकारात्मक जीवनदृष्टी यांचे महत्त्व सांगितले. या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महामंत्री नामदेव डाहुले, भारतीय जनता पक्षाच्या अनु सूचित जाती अध्यक्ष विमल कातकर, नगर सेविका सविता कांबळे, शितल गुरनुले, ज्योती जिवने, नगरसेवक भालचंद्र दाणव, निलिमा वनकर, हेमलता खोब्रागडे, शालिनी राउत आदिंची उपस्थिती होती.

              या प्रसंगी पुढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले की, माणूस सुखी नाही, याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे त्याला खर्या सुखाचा शोध घेता आलेला नाही. प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात सुखाच्या मागे धावत असते. मात्र समाधान मिळविण्यासाठी नेमके काय आवश्यक आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे. भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेला धम्माचा मार्ग माणसाला स्वतःकडे पाहण्याची, स्वतःच्या विचारांचे परीक्षण करण्याची आणि जीवनात संयम व समाधान निर्माण करण्याची शिकवण देतो. वर्षावास काळ हा केवळ धार्मिक आचरणाचा काळ नसून आत्मचिंतन, आत्मशुद्धी आणि सद्विचारांची जोपासना करण्याची संधी आहे.

            आपण वर्षावास काळात उपासथ व्रताचे पालन करत असताना आपल्या चित्ताचे शुद्धीकरण करतो. मनामध्ये चांगले विचार निर्माण व्हावेत, आपल्या आचरणात सकारात्मक बदल घडावा, यासाठी शरीर आणि मन दोन्ही शुद्ध असणे आवश्यक आहे. मन शुद्ध असेल तर विचार शुद्ध होतात आणि विचार शुद्ध असतील तर आपले आचरणही चांगले घडते. धम्माची शिकवण माणसाला याच आत्मपरिवर्तनाच्या दिशेने घेऊन जाते. उपासक आणि उपासिकांनी वर्षावास काळात केलेले व्रतपालन हे आत्मसंयम, श्रद्धा आणि धम्म निष्ठेचे प्रतीक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

            मानव जीवनाचे महत्त्व विशद करताना आमदार जोरगेवार यांनी माणसातील संवेदनशीलतेचा विशेष उल्लेख केला. ते म्हणाले की, मानव हा दुसर्याचे दुःख समजू शकतो आणि त्याचबरोबर ते दुःख दूर करण्याची क्षमताही त्याच्यात आहे. दुसर्याच्या वेदना जाणून घेणे, त्याच्या अडचणीच्या काळात मदतीला धावून जाणे आणि दुसर्याच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करणे, हीच मानवी जीवनाची खरी श्रेष्ठता आहे. केवळ स्वतःसाठी जगण्यापेक्षा दुसर्याच्या सुख-दुःखात सहभागी होणे, हीच मानवतेची खरी ओळख आहे.

            यावेळी त्यांनी वरोरा येथील आनंदवनातील दिव्यांग बांधवांच्या एका कार्यक्रमातील अनुभवही उपस्थितांसमोर मांडला. ते म्हणाले की, आनंदवनातील दिव्यांग बांधवांच्या गीतगायनाचा कार्यक्रम ऐकण्यासाठी गेलो होतो. त्या ठिकाणी ज्याला दोन हात नाहीत, ज्याला डोळ्यांनी दिसत नाही, असा दिव्यांग बांधव या जगण्यावर शतदा प्रेम करावे हे गीत गात होता. त्याच्या परिस्थितीकडे पाहिले तर आयुष्यात किती अडचणी असू शकतात, याची जाणीव होते. मात्र तरीही तो जीवनावर प्रेम करण्याचा संदेश देत होता.

 या अनुभवाचा संदर्भ देत ते पुढे म्हणाले की, काही लोकांकडे जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुखसोयी असतात, सर्व काही असते. तरीही ते जीवन जगणे कठीण असल्याचे सांगतात. दुसरीकडे, अनेक आव्हाने आणि मर्यादा असतानाही काही व्यक्ती आयुष्यावर मनापासून प्रेम करतात. आनंदवनातील त्या दिव्यांग बांधवाच्या गीतातून मला जीवनाकडे सकारात्मकतेने पाहण्याची प्रेरणा मिळाली. त्यामुळे आयुष्यात काय नाही, याचा विचार करण्यापेक्षा जे आहे त्याचे महत्त्व ओळखून समाधानी राहणे आणि प्रत्येक क्षण आनंदाने जगणे अधिक महत्त्वाचे आहे, असा संदेश त्यांनी दिला.

              वर्षावास काळात श्रद्धेने आणि निष्ठेने उपासथ व्रताचे पालन करणार्या उपासक-उपासिकांचा सन्मान करताना त्यांच्या संयमाचे, साधनेचे आणि धम्माप्रती असलेल्या समर्पणाचे आमदारांनी कौतुक केले. अशा उपक्रमांतून धम्मविचारांची जोपासना होण्यासोबतच समाजात नैतिक मूल्ये, आत्मसंयम आणि मानवतेची भावना अधिक दृढ होण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले.या कार्यक्रमात उपासक-उपासिकांचा सन्मान करण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये