तब्बल २१ वर्षांनंतर चित्रकला विद्यालयाचे मित्र एकत्र : शेतात रंगला स्नेहमिलन सोहळा!
जुन्या आठवणींना उजाळा, मैत्रीच्या रंगांनी रंगला दिवस

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
तब्बल २१ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर २००५ ते २००७ या कालखंडातील चित्रकला विद्यालयाच्या मित्रमंडळींचे स्नेहमिलन श्री. हनुमान पारधे यांच्या शेतात उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणात पार पडले. अनेक वर्षांनंतर एकत्र आलेल्या मित्रांनी जुन्या आठवणींना उजाळा देत गप्पा, हास्यविनोद आणि आपुलकीच्या क्षणांतून मैत्रीचा अनमोल धागा पुन्हा घट्ट केला.
या स्नेहमिलन सोहळ्यात सुप्रसिद्ध रांगोळीकार तसेच चित्रकार व शिक्षक गणेशजी चवरे, आनंद तागडे, सुकेशनी तागडे, चालखूरे, मंजुषा तुराणकर, योगेश्वरी जोगी, सचिनजी वाळके, मंगला सिडाम आदी मित्रमंडळी सहभागी झाली होती. तसेच कार्यक्रमाचे छायाचित्रण आणि नियोजनाची जबाबदारी समर्थपणे सांभाळणारे मित्र संदीप गोखरे यांनीही या स्नेहमिलनात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
चित्रकला विद्यालयातील शिक्षणाच्या काळात जुळलेली मैत्री, त्या काळातील आठवणी, अनुभव आणि जीवनातील बदल याविषयी मनमोकळ्या चर्चा रंगल्या. दोन दशकांहून अधिक काळ लोटला असला तरी मैत्रीतील जिव्हाळा, प्रेम आणि आपुलकी आजही तितकीच कायम असल्याचे या भेटीतून प्रकर्षाने जाणवले.
शेतातील निसर्गरम्य वातावरणात आयोजित या स्नेहमिलनाने प्रत्येकाच्या मनात आनंदाचे क्षण निर्माण केले. पुन्हा अशाच भेटीगाठी घडवून आणण्याचा संकल्प करीत ‘पुन्हा भेटू’ या भावनिक निरोपासह कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



