रेती तस्करांवर मध्यरात्री उपविभागीय अधिकाऱ्यांचा “सर्जिकल स्ट्राईक!”
सात ट्रॅक्टर जप्त ; पाच ट्रॅक्टर पसार! ; गोंडपिपरी महसूल विभागाच्या धडक कारवाईने रेती माफियांमध्ये खळबळ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ तालुक्यात अवैध रेती उपशाचा धंदा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, मध्यरात्रीच्या अंधारात सुरू असलेल्या रेती चोरीला उपविभागीय अधिकारी आकाश वर्मा यांनी जोरदार दणका दिला आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांचा फायदा घेत नदीपात्रातून बिनधास्तपणे रेती उपसा सुरू असल्याची माहिती मिळताच त्यांनी महसूल व पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीने नदीघाटावर धडक कारवाई केली. यावेळी तब्बल १२ ट्रॅक्टर रेती उपसा करताना आढळून आले. त्यापैकी सात ट्रॅक्टर प्रशासनाच्या ताब्यात आले, तर पाच ट्रॅक्टर घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती समोर येत आहे. या कारवाईमुळे अवैध रेती व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
रेतीघाट बंद, मग शहरात रेतीचे ढिगारे येतात कुठून? हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. गोंडपिपरी शहरात मोकळ्या जागांपासून ते रस्त्यालगत अनेक ठिकाणी रेतीचे साठे दिसून येत असताना, या रेतीची अधिकृत परवानगी आहे का, तिचा स्रोत कोणता आणि वाहतुकीचे नियम पाळले जातात का, याची सखोल चौकशी होण्याची गरज आहे. रात्रीच्या अंधारात रस्त्यांवर आणि चौकाचौकांत माणसे तैनात करून रेतीची वाहतूक केली जात असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. काही दिवसांपूर्वी रेती व्यावसायिकांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर या अवैध व्यवसायाचे धागेदोरे पुन्हा चर्चेत आले आहेत. एकीकडे बारा गावांतील शेतकरी एमआयडीसीविरोधात आपल्या हक्कांसाठी संघर्ष करीत असताना दुसरीकडे अवैध रेती उपशाचा हा प्रकार सुरू असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
*सात ट्रॅक्टर जप्त, मग पाच पसार झालेल्यांचे काय?*
महसूल विभागाच्या या कारवाईतून प्रशासनाने धाडस दाखवले असले तरी पाच ट्रॅक्टर घटनास्थळावरून निसटण्यात यशस्वी कसे झाले, हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे. मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे ही वाहने पळून गेल्याची चर्चा असली तरी त्यामागील नेमके कारण तपासातून स्पष्ट होणे आवश्यक आहे. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि पोलीस ठाणेदार यांच्या समन्वयातून झालेल्या या कारवाईनंतर आता प्रशासन पसार झालेल्या वाहनांचा शोध घेणार का, अवैध रेती साठ्यांवरही कारवाई करणार का आणि या संपूर्ण व्यवसायामागील सूत्रधारांपर्यंत पोहोचणार का, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. कारवाई सात ट्रॅक्टरपुरती मर्यादित राहणार की रेती चोरीच्या संपूर्ण साखळीवर प्रशासनाचा हातोडा पडणार? हा खरा प्रश्न आहे.



