७ वर्षांचे वय, हृदयाला १२ मि.मी.चे छिद्र, लाखोंचा खर्च… प्रिशासाठी धावले तनय देशकर
चिमुरड्या प्रिशाची लाखोंची हृदयशस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रह्मपुरी :_ वय फक्त सात वर्ष… खेळण्या-बागडण्याच्या वयातच नियतीने एका चिमुरडीची कठीण परीक्षा घेतली. अवघ्या सात वर्षांच्या प्रिशा चहांदे हिच्या हृदयाला १२ मि.मी.चे छिद्र असल्याचे निदान झाले आणि तिच्या आई-वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला; मात्र त्यासाठी लागणारा लाखोंचा खर्च ऐकून सामान्य आर्थिक परिस्थिती असलेले आई-वडील पूर्णपणे खचून गेले. आपल्या मुलीचे आयुष्य वाचवायचे कसे, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला होता. अशा अत्यंत कठीण प्रसंगी त्यांच्या मदतीला धावून आले ते भाजपा युवा मोर्चाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष तनय देशकर.
वृत्त पत्र व सोशल मीडियाच्या माध्यमातून ब्रह्मपुरीच्या तनय देशकर यांच्या सामाजिक व वैद्यकीय मदतकार्याची माहिती प्रिशाच्या आई-वडिलांना होती. आपल्या मुलीच्या उपचारांसाठी तनय देशकर मदतीचा हात देईल, या आशेने त्यांनी त्यांच्या संपर्कातील असलेले ब्रह्मपुरी तालुक्यातील किन्ही गावचे माजी सरपंच तथा भाजपचे तालुका सचिव अभय कुथे यांच्याशी संपर्क साधला. अभय कुथे यांनी प्रिशा व आई वडिलांची व्यथा तनय देशकर यांनी सांगितली व देशकर यांच्याशी बोलणे करून दिले.
प्रिशाची वैद्यकीय स्थिती आणि कुटुंबाची अत्यंत बिकट आर्थिक परिस्थिती समजताच तनय देशकर यांनी तत्परतेने आपले प्रयत्न सुरु केले. देशकर यांनी प्रिशाच्या आई-वडिलांना नागपूर येथील एका नामांकित रुग्णालयात तपासणीसाठी जाण्याचे सांगितले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अभय कुथे यांनाही प्रिशाच्या कुटुंबासोबत रुग्णालयात जाण्याची व्यवस्था करून दिली. रुग्णालयात झालेल्या सविस्तर तपासणीनंतर प्रिशावर हृदयाची शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले.
मात्र, लाखोंचा खर्च उभा करणे या कुटुंबाच्या आवाक्याबाहेर होते. ही बाब लक्षात घेऊन तनय देशकर यांनी केवळ आर्थिक मदतीचे आश्वासन देऊन थांबण्याऐवजी थेट रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधला. प्रिशाची परिस्थिती, कुटुंबाची आर्थिक असमर्थता आणि शस्त्रक्रियेची निकड याबाबत त्यांनी रुग्णालय प्रशासनासोबत सविस्तर चर्चा केली. ही शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत कशी करता येईल, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. रुग्णालय प्रशासनाशी समन्वय साधत आवश्यक नियोजन केले आणि शस्त्रक्रिया मोफत होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला.
या प्रयत्नांना यश आले. शस्त्रक्रियेची तारीख निश्चित झाली आणि ठरलेल्या दिवशी प्रिशाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. अखेर तिच्यावर यशस्वी हृदयशस्त्रक्रिया पार पडली. विशेष म्हणजे, लाखोंचा खर्च अपेक्षित असलेली ही शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आली.
आज प्रिशाची प्रकृती सुधारत असून ती उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहे. आपल्या चिमुरडीला पुन्हा निरोगी आयुष्याच्या दिशेने वाटचाल करताना पाहून तिचे आई-वडील प्रचंड आनंदी आणि समाधानी आहेत. ज्या संकटाने त्यांना पूर्णपणे हतबल केले होते, त्यातून मुलगी सुखरूप बाहेर पडत असल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. आई-वडिलांसाठी मुलगी सुखरूप असणे, तिचे हसू पुन्हा फुलणे आणि तिचे बालपण पुन्हा बहरणे यापेक्षा मोठे सुख दुसरे कोणतेच नाही.
एका सात वर्षांच्या चिमुरडीच्या हृदयातील छिद्राचे निदान झाल्यापासून ते तिची शस्त्रक्रिया यशस्वी होईपर्यंत भाजपा युवा मोर्चा चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष तनय देशकर यांनी दाखवलेली तत्परता, रुग्णालय प्रशासनाशी केलेला समन्वय आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा या संपूर्ण प्रक्रियेत महत्त्वपूर्ण ठरला. संकटाच्या क्षणी केवळ सहानुभूती व्यक्त न करता, त्या संकटातून मार्ग काढण्यासाठी प्रत्यक्ष पुढाकार घेणे, हीच सामाजिक बांधिलकीची खरी ओळख असल्याचे या घटनेतून अधोरेखित झाले आहे.



