ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रभाग क्रमांक ४ मध्ये कचऱ्याचे साम्राज्य, लोकप्रतिनिधींच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह!

प्रयास सभागृह परिसरात कचरा कुंडी ओव्हरफ्लो, सर्वत्र घाण आणि दुर्गंधी; सोशल मीडियावर वाहवा मिळवणाऱ्या लोकप्रतिनिधींना स्वच्छतेची समस्या का दिसत नाही?

चांदा ब्लास्ट

घुग्घूस, चंद्रपूर : घुग्घूस नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक ४ मधील प्रयास सभागृह परिसरातील एका मोकळ्या प्लॉटवर ठेवण्यात आलेली कचरा कुंडी स्थानिक नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. प्रभागातील नगरसेवक, नगरसेविका आणि संबंधित कंत्राटदार यांच्या कथित निष्क्रियतेमुळे कचरा कुंडी पूर्णपणे भरली आहे. कुंडीतील कचरा बाहेर पडून आजूबाजूच्या संपूर्ण परिसरात पसरला आहे. मात्र, स्वच्छता व्यवस्थेकडे कोणाचेही लक्ष जात नसल्याचे चित्र दिसत आहे.

प्लास्टिक, घरगुती कचरा आणि पालापाचोळ्याच्या ढिगाऱ्यांमुळे संपूर्ण परिसर अस्वच्छ झाला आहे. सर्वत्र पसरलेल्या दुर्गंधीमुळे स्थानिक नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना याच घाणीतून मार्ग काढावा लागत आहे. त्यातच डास आणि माशांचा वाढता प्रादुर्भाव पाहता आजार पसरण्याची भीतीही नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

आता स्वच्छतेची जबाबदारी कोण घेणार?

स्थानिक नागरिकांचा सवाल आहे की, विजेच्या खांबांवर रोषणाई करून सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ प्रसिद्ध करणाऱ्या लोकप्रतिनिधींना आपल्याच प्रभागातील पसरलेला कचरा का दिसत नाही? खांबांवर रोषणाई करणे म्हणजेच विकास आहे का? सोशल मीडियावर विकासाची छायाचित्रे दाखवून नागरिकांच्या समस्या सुटणार आहेत का?

नागरिकांच्या मते, विकास म्हणजे केवळ सणासुदीला रोषणाई करणे आणि सोशल मीडियावर वाहवा मिळवणे नव्हे, तर नियमित स्वच्छता, कचरा उचलण्याची योग्य व्यवस्था आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हीदेखील लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे.

आता प्रभागातील लोकप्रतिनिधी आणि संबंधित कंत्राटदार या समस्येकडे कधी लक्ष देणार? नगर परिषद प्रशासनाला जाग कधी येणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नागरिकांना सोशल मीडियावरील विकासाचे दावे नकोत, तर आपल्या परिसरात प्रत्यक्ष स्वच्छता आणि मूलभूत सुविधा हव्या आहेत. नगर परिषद प्रशासन कचरा कुंडी हटविणे, नियमित कचरा उचलणे आणि संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्यासाठी ठोस पावले कधी उचलणार, याकडे घुग्घूसकरांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये