ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

काँग्रेसची धाबा–तोहोगाव सर्कल सहविचार सभा उत्साहात संपन्न!

‘वोट रक्षक’ म्हणून कार्यकर्त्यांनी जबाबदारी पार पाडावी_अरुण धोटे यांचे आवाहन ; आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संघटन मजबूत करण्यावर भर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :_ आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने ग्रामीण भागातील संघटनात्मक बांधणीला वेग दिला असून, कार्यकर्त्यांमध्ये समन्वय, एकजूट आणि निवडणुकीच्या दृष्टीने नियोजनबद्ध तयारी करण्यावर भर दिला जात आहे. याच अनुषंगाने काँग्रेसची धाबा–तोहोगाव सर्कल सहविचार सभा किरमिरी येथे आज (रविवार, दि. २२ नोव्हेंबर) उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

या सभेत राजुरा विधानसभा समन्वयक तथा नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. आगामी निवडणुकांमध्ये पक्षाची भूमिका प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासोबतच मतदार यादीतील प्रत्येक पात्र मतदाराच्या मतदानाच्या अधिकाराचे संरक्षण करण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी केले.

लोकशाही व्यवस्थेत मतदानाचा अधिकार अत्यंत महत्त्वाचा असून, प्रत्येक पात्र मतदाराचे नाव मतदार यादीत कायम राहावे, कोणताही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये आणि मतदारांच्या अधिकारांवर गदा येऊ नये, यासाठी कार्यकर्त्यांनी ‘वोट रक्षक’ म्हणून सजगपणे काम करावे, असे अरुण धोटे यांनी सांगितले.

यावेळी आगामी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने पक्षाची संघटनात्मक स्थिती, बूथनिहाय नियोजन, कार्यकर्त्यांची जबाबदारी आणि जनसंपर्क अभियान यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. गावपातळीवर पक्षाचे जाळे अधिक मजबूत करणे, नव्या कार्यकर्त्यांना संघटनेशी जोडणे आणि सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये समन्वय निर्माण करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

केवळ निवडणुकीच्या काळात सक्रिय न राहता वर्षभर जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणारे संघटन उभे करण्याची गरजही यावेळी अधोरेखित करण्यात आली. ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, युवक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

धाबा–तोहोगाव सर्कलमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सहभागातून पार पडलेल्या या सहविचार सभेमुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या संघटनात्मक हालचालींना गती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. गावागावांत पक्षाची ताकद वाढविण्यासह मतदारांशी थेट संपर्क साधण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

या सहविचार सभेला काँग्रेस तालुकाध्यक्ष अशोक रेचणकर, शहराध्यक्ष राजू झाडे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष विपिन पेद्दुलवार, ज्येष्ठ नेते देवेंद्र बट्टे, अजय माडुरवार, श्रीनिवास कंदनुरीवार, संतोष बंडावार, वनिता वाघाडे, पायल दुर्गे, नामदेव सांगडे, देविदास सातपुते, साईनाथ कोडापे, बाबुराव बोंडे, नरेंद्र वाघाडे, राजेश डोंगरे, राहुल लडके, आशिष निमगडे, दिलीप पुलगमकर, कवडू कुबडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ता आणि नागरिकांची उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये