कापूस आयातीवरील शून्य टक्के शुल्काचा निर्णय रद्द करा!
आयात होणाऱ्या कापसावर किमान २० टक्के शुल्क लागू करण्याची भास्कर भाऊ ताजने यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
केंद्र सरकारने कापूस आयातीवरील आयात शुल्क ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत शून्य टक्के केल्याचा निर्णय रद्द करून परदेशातून आयात होणाऱ्या कापसावर किमान २० टक्के आयात शुल्क लागू करावे, अशी मागणी शिवसेनेचे चंद्रपूर जिल्हाप्रमुख भास्कर भाऊ ताजने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महाराष्ट्रात यंदा प्रतिकूल हवामान, पावसातील अनियमितता आणि नैसर्गिक आपत्तीमुळे कापूस उत्पादनात मोठी घट झाली आहे. अनेक भागांत मागील वर्षाच्या तुलनेत कापसाचे उत्पादन निम्म्यापेक्षाही कमी झाले आहे. त्यामुळे आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या कापसाला योग्य भाव मिळण्याची प्रतीक्षा आहे.
अशा परिस्थितीत शून्य टक्के आयात शुल्कामुळे परदेशी कापसाचा देशांतर्गत बाजारपेठेत पुरवठा वाढून भारतीय कापसाच्या बाजारभावावर दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे. परिणामी महाराष्ट्रासह देशातील लाखो कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते, असे ताजने यांनी निवेदनात नमूद केले आहे.
केंद्र सरकारने कापूस आयातीवरील शून्य टक्के शुल्काचा निर्णय रद्द करावा, आयात होणाऱ्या कापसावर किमान २० टक्के शुल्क लागू करावे, शेतकऱ्यांना योग्य व हमीभाव मिळण्यासाठी उपाययोजना कराव्यात तसेच राज्य शासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करावा, अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत.
कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे ठाम भूमिका मांडून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, असे आवाहनही भास्कर भाऊ ताजने यांनी केले आहे.



