ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कन्हाळगाव अभयारण्याचा प्रस्ताव रद्द करण्यासाठी मुनगंटीवारांना साकडे..!

शेतकरी, आदिवासी बांधवांच्या हक्कांसाठी विनोद चांदेकर आक्रमक 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :–संपूर्ण राज्यात चर्चित असलेल्या गोंडपिपरी तालुक्यातील कन्हाळगाव परिसरात प्रस्तावित अभयारण्य निर्मितीच्या हालचालींनी स्थानिक गावांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अभयारण्याच्या प्रस्तावामुळे शेती, जमिनीचे हक्क, पारंपरिक वनहक्क आणि उपजीविकेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करत, कन्हाळगाव अभयारण्य रद्द करण्यासाठी निवेदनाद्वारे साकडे घालत, सामाजिक कार्यकर्ते विनोद चांदेकर यांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शविला आहे.

गोंडपिपरी तालुक्यातील कन्हाळगाव, चिवंडा, गणपूर, दुबारपेठ, चेक दुबारपेठ, गोजोली मक्ता, चेक गोजोली, वामनपल्ली, पारडी, सरांडी यांसह तालुक्यातील ४७ गावांतील नागरिकांच्या भवितव्याचा विचार न करता अभयारण्याचा निर्णय लादू नये, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे.

वन्यजीव संरक्षणाला विरोध नाही; मात्र भूमिपुत्रांचे हक्क हिरावू नका!, अशी स्पष्ट भूमिका मांडत सामाजिक कार्यकर्ते विनोद चांदेकर यांनी माजी अर्थमंत्री तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन सादर केले. जंगल आणि वन्यजीवांचे संवर्धन महत्त्वाचे असले तरी पिढ्यान्‌पिढ्या जंगलाच्या सान्निध्यात राहणाऱ्या शेतकरी व आदिवासी कुटुंबांच्या जमिनी, वनहक्क आणि रोजगारावर गदा येता कामा नये, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. वनहक्क कायदा २००६ आणि संबंधित कायदेशीर तरतुदींचे पालन करून ग्रामस्थांचे अधिकार सुरक्षित ठेवण्याची मागणीही करण्यात आली आहे.

अभयारण्य प्रक्रिया स्थगित करून प्रस्ताव रद्द करण्यासाठी शासनदरबारी आवाज उठवावा, अशी प्रमुख मागणी करत प्रभावित गावांच्या स्वतंत्र ग्रामसभा घ्याव्यात, नागरिकांच्या हरकती नोंदवाव्यात, शेतजमिनी व वैयक्तिक तसेच सामुदायिक वनहक्कांचे सर्वेक्षण करावे आणि संभाव्य परिणामांचा अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणी चांदेकर यांनी केली आहे. तसेच वन, महसूल व आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांसह ग्रामस्थांची संयुक्त बैठक आयोजित करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रश्नात पुढाकार घेऊन स्थानिक जनतेला न्याय मिळवून द्यावा; अन्यथा ग्रामस्थांना लोकशाही व संविधानिक मार्गाने जनआंदोलन उभारावे लागेल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनकर्त्यांमध्ये त्रिमूर्ती भाई_भाई ग्रूपचे संचालक, सामाजिक कार्यकर्ते विनोद चांदेकर, दिलीप सोयाम, नितेश तलांडे, संजय कुबडे, मुकुंदा सोयाम, अतुल मडावी, अमित आत्राम, विजय कन्नाके, देवराव आत्राम यांसह तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांचा सहभाग होता.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये