ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैध रेती वाहतुक करणारा ट्रॅक्टर जप्त : चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

भद्रावती पोलिसांची कारवाई : ५.०७ लाखांचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

        अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरोधात भद्रावती पोलिसांनी कारवाई करीत रेतीने भरलेला ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त केली. या कारवाईत एकूण ५ लाख ७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई २२ नोव्हेंबर रोजी ठाणेदार योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, ठाणेदार योगेश्वर पारधी यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीव मिश्रा, पोलीस उपनिरीक्षक संतोष केदार, पोलीस अंमलदार नितीन आमटे (ब.नं. १२१०) व पथक अवैध धंदे आणि विनारॉयल्टी रेती वाहतुकीविरोधात कारवाईसाठी पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान, मौजा चिरादेवी ते सुंमठाणा मार्गावर लाल रंगाचा महिंद्रा ४७५ ट्रॅक्टर व त्याला जोडलेली बिना नंबरची ट्रॉली आढळून आली. ट्रॉलीमध्ये अंदाजे एक ब्रास रेती असल्याचे निदर्शनास आले.

ट्रॅक्टर चालकाची चौकशी केली असता त्याने श्रीकांत अनिल काळे (वय ३६, व्यवसाय चालक, रा. चिरादेवी, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर) असे नाव सांगितले. रेती वाहतुकीसाठी रॉयल्टी परवाना अथवा संबंधित कागदपत्रे नसल्याचे तसेच वाहन चालविण्याचा परवानाही नसल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले. सदर रेती चिरादेवी येथील नाल्यातून चोरी करून आणल्याचे चालकाने सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले.

पंचांच्या उपस्थितीत पंचनामा करून अंदाजे ४ लाख रुपये किमतीचा महिंद्रा ४७५ ट्रॅक्टर, १ लाख रुपये किमतीची ट्रॉली व ७ हजार रुपये किमतीची एक ब्रास रेती, असा एकूण ५ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी फिर्यादी पोलीस हवालदार निखिल पुंडलीकराव कौरासे (ब.नं. २४७८, पोलीस स्टेशन भद्रावती) यांच्या तक्रारीवरून आरोपी श्रीकांत अनिल काळे याच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक १०९२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), जमीन महसूल कायद्याचे कलम ४८ तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८१ व १९२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये