ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ऐन धान कापणीत सावलीत अवकाळीची हजेरी

तूर पिकावरही संकट ; बळीराजा चिंतेत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

सावली :_ तालुक्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी धांदल उडाली आहे. सध्या तालुक्यातील गावागावांत ऐन धान कापणीची लगबग सुरू असतानाच पडणाऱ्या रिमझिम पावसामुळे हाताशी आलेल्या पिकाचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच, शिवारात जोमात असलेल्या तूर पिकाला आलेला ‘बार’ (फुलोरा) पावसामुळे झडण्याची शक्यता असून, त्यामुळे यंदा तुरीच्या उत्पादनात घट येण्याचे संकेत मिळत आहेत. या अस्मानी संकटामुळे सावली तालुक्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

    सध्या सावली तालुक्याच्या विविध भागांत धान कापणी आणि मळणीची कामे जोरात सुरू आहेत. मात्र, अचानक सुरू झालेल्या रिमझिम पावसामुळे कापलेले धान शेतातच भिजण्याची किंवा काळवंडण्याची शक्यता आहे. कापणी व मळणीच्या कामात खोळंबा झाल्याने श्रम आणि वेळ वाया जाऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दुसरीकडे, सावली तालुक्यातील तूर पिकाची अवस्था सध्या नाजूक टप्प्यात आहे. पिकाला आलेला बार पावसाच्या थेंबांमुळे व ढगाळ वातावरणामुळे झडल्यास शेंगा कमी लागून उत्पादनात मोठी घट होऊ शकते, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याशिवाय, ढगाळ आणि दमट वातावरणामुळे पिकावर किडी व रोगांचा प्रादुर्भाव होण्याचा धोकाही वाढला आहे.

      वर्षभर कष्ट करून उभे केलेले पीक ऐन हातातोंडाशी आले असताना सावलीत अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. प्रशासनाने तातडीने परिस्थितीची पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना योग्य ती मदत द्यावी, अशी मागणी सावली तालुक्यातून पुढे येत आहे.

“*सध्या आमच्याकडे धान कापणीची कामे जोरात सुरू आहेत, पण रिमझिम पावसाने मोठा खोडा घातला आहे. कापलेले धान शेतातच भिजण्याची भीती वाटतेय. त्यातच तुरीला आलेला बार या पावसामुळे झडण्याची शक्यता असल्याने उत्पादनात मोठी घट होईल, अशी चिंता आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून आम्हाला आर्थिक मदत द्यावी.”*

*देवराव मुद्दमवार,शेतकरी हरंबा*

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये