मानधनाच्या मोबदल्यात २५ हजारांची लाच ; आयटीआय प्राचार्य एसीबीच्या जाळ्यात!
पोंभुर्णा येथील आयटीआयमधील प्रकरण, लिपिकासह प्राचार्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
शासकीय कार्यालयांमधील लाचखोरीचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. पोंभुर्णा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील महिला कर्मचाऱ्याच्या पाच महिन्यांच्या मानधनाच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांची लाच मागून तडजोडीनंतर २५ हजार रुपये स्वीकारताना संस्थेच्या प्राचार्य आणि एका कनिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
२३ नोव्हेंबर २०२६ रोजी झालेल्या या कारवाईमुळे शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पोंभुर्णा येथील प्राचार्य संजय कल्पना खोब्रागडे (वय ५५) आणि कनिष्ठ लिपिक नरेंद्र मलिक (वय ४७) यांचा समावेश आहे.
प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार महिला संस्थेत वायरमन विषयाच्या सैद्धांतिक व प्रात्यक्षिक तासिका घेण्याचे काम करीत होती. त्यासाठी तिला सैद्धांतिक तासिकांकरिता प्रतितास २५० रुपये, तर प्रात्यक्षिक तासिकांसाठी प्रतितास १२५ रुपये मानधन मिळत होते. संबंधित पाच महिन्यांचे मानधन नोव्हेंबर महिन्यात मिळणे अपेक्षित होते.
मात्र, या मानधनाची रक्कम काढून देण्याच्या मोबदल्यात प्राचार्य संजय खोब्रागडे यांनी कनिष्ठ लिपिक नरेंद्र मलिक यांच्यामार्फत तक्रारदार महिलेकडे ३० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीची गंभीर दखल घेत एसीबीने प्राथमिक पडताळणी केली. यावेळी तडजोडीअंती २५ हजार रुपये लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविण्यात आल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर २३ नोव्हेंबर २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला. या कारवाईदरम्यान लाचेची रक्कम २५ हजार रुपये स्वीकारताना कनिष्ठ लिपिक नरेंद्र मलिक याला रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणात प्राचार्य संजय खोब्रागडे यांचाही सहभाग असल्याने त्यांनाही ताब्यात घेण्यात आले.
या कारवाईमुळे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील कारभारावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे. शासकीय कार्यालयात पारदर्शक कारभार आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाची अपेक्षा असताना अशा घटनांमुळे प्रशासनाच्या विश्वासार्हतेला धक्का बसत आहे.
*मानधनासाठीही लाचेची मागणी?*
महिला कर्मचाऱ्याने केलेल्या कामाचे मानधन मिळविण्यासाठीच लाचेची मागणी झाल्याचा आरोप समोर आल्याने या प्रकरणाने अधिक गंभीर स्वरूप धारण केले आहे. शासकीय संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काच्या मोबदल्यासाठीही अशा प्रकारच्या कथित लाचखोरीला सामोरे जावे लागत असेल, तर सामान्य कर्मचाऱ्यांनी न्याय कोणाकडे मागायचा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.



