देऊळगाव राजा येथे विश्व हिंदू परिषदेच्या ‘हितचिंतक अभियानास सुरवात
प्रत्येक हिंदू बांधवाने सहभागी होण्याचे आवाहन
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
विश्व हिंदू परिषद, विदर्भ प्रांताच्या वतीने संपूर्ण विदर्भात दिनांक २२ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२६ या कालावधीत ‘हितचिंतक अभियान’ राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने श्री नरहरीनाथ महाराज संस्थान येथे श्री मोहननाथ महाराज पैठणकर यांचे आशीर्वादाने सुरवात करण्यात आली.
यावेळी विहीप प्रांत गोरक्ष प्रमुख अतुल आयाचीत,बुलढाणा जिल्हा अध्यक्ष मनीष काबरा, देऊळगाव राजा प्रखंड अध्यक्ष सुनिल धोंडरकर उपस्थित होते. यावेळी अभियान सुरुवात करताना प्रांत गोरक्ष प्रमुख अतुल आयाचीत यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये अभियानाच्या माध्यमातून हिंदू समाजातील प्रत्येक घटकापर्यंत विश्व हिंदू परिषदेचे विचार, कार्य आणि उद्दिष्टे पोहोचविण्यासोबतच अधिकाधिक हिंदू बांधवांना संघटनेच्या कार्याशी जोडण्याचा संकल्प करण्यात आला आहे. विश्व हिंदू परिषद ही संघटना २९ ऑगस्ट १९६४ रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पावन पर्वावर मुंबई येथे स्थापन झाली. हिंदू समाजाला संघटित करणे, धर्म-संस्कृती, परंपरा, संस्कार आणि हिंदू जीवनमूल्यांचे संरक्षण व संवर्धन करणे, तसेच समाजात समरसता व एकात्मतेची भावना दृढ करणे हे परिषदेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. पूजनीय संत-महात्म्यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेने गेल्या सहा दशकांहून अधिक काळ देशभरात विविध क्षेत्रांत कार्य उभे केले आहे.विश्व हिंदू परिषदेचे कार्य प्रामुख्याने धर्म, संस्कृती व परंपरांचे जतन, सेवा कार्य आणि सामाजिक समरसता या तीन प्रमुख आधारस्तंभांवर चालते. देशभरात परिषदेच्या माध्यमातून हजारो सेवा प्रकल्प राबविले जातात. वनवासी व दुर्गम भागात शिक्षण, आरोग्य, संस्कार केंद्रे, विद्यार्थी निवास, व्यावसायिक प्रशिक्षण तसेच आपत्तीच्या काळात मदतकार्य अशा विविध माध्यमांतून समाजसेवेचे कार्य केले जाते.
परिषदेच्या कार्यात बजरंग दल, दुर्गावाहिनी आणि मातृशक्ती या आयामांचाही महत्त्वपूर्ण सहभाग आहे. युवकांमध्ये राष्ट्रभक्ती, शारीरिक व चारित्र्य विकास, सामाजिक बांधिलकी आणि संघटन परिषद, विदर्भ प्रकौशल्य निर्माण करण्याचे कार्य बजरंग दलाच्या माध्यमातून केले जाते. महिलांचे सक्षमीकरण, स्वसंरक्षण आणि समाजातील महिलांचा सन्मान वाढविण्यासाठी दुर्गावाहिनी व मातृशक्ती कार्यरत आहेत. परिषदेच्या माध्यमातृन रामोत्सव, सीता नवमी, अखंड भारत संकल्प दिन, स्थापना दिन, दुर्गाष्टमी जागरण, गोपाष्टमी, शौर्य दिन, बलिदान सप्ताह आणि समरसता सप्ताह असे विविध उपक्रम दरवर्षी आयोजित केले जातात.
या कार्यक्रमांद्वारे हिंदू समाजात धार्मिक जागृती, सांस्कृतिक अभिमान, सामाजिक एकात्मता आणि राष्ट्रभक्तीची भावना दृढ करण्याचा प्रयत्न केला जातो. ‘हिंदवः सोदराः सर्वे, न हिंदू पतितो भवेत्। मम दीक्षा हिन्दू रक्षा, मम मन्त्रः समानता ।।’ या विचारानुसार सर्व हिंदू बांधव एक आहेत, कोणीही उच्च-नीच नाही, प्रत्येकाला समान सन्मान आणि समान संधी मिळाली पाहिजे, हा सामाजिक समरसतेचा संदेश परिषद देत आहे. याच व्यापक उद्देशाने आयोजित करण्यात येणाऱ्या हितचिंतक अभियानात प्रत्येक हिंदू कुटुंबाने, युवकांनी, महिला भगिनींनी, व्यावसायिकांनी तसेच समाजातील विविध क्षेत्रांतील नागरिकांनी सहभागी व्हावे. असे आवाहन करण्यात आले आहे.



