कायद्याचे रक्षकच वादाच्या भोवऱ्यात! कारवाई (सांगोडा )येथील पोलीस पाटलाविरुद्ध गुन्हा दाखल
ढोलकीच्या वादातून महिलेला अश्लील शिवीगाळ व अपमानित केल्याचा आरोप; पोलीस पाटलाच्या वर्तनाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी होणार का?

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदूर : कोरपना तालुक्यातील कारवाई (सांगोडा) येथील पोलीस पाटलावरच महिलेचा अपमान केल्याचा गंभीर आरोप झाल्याने परिसरात चर्चा सुरू झाली आहे. गावात कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस पाटलाविरुद्ध शिवीगाळ व मारहाणीच्या तक्रारीवरून गडचांदूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप रमेश पांचभाई आणि आकाश ज्ञानेश्वर वडस्कर अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, तक्रारदार महिलेच्या पतीने गावातील भजनासाठी ढोलकी खरेदी केली होती. ही ढोलकी परत देण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. २२ नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे ९ वाजताच्या दरम्यान हा वाद वाढला. यावेळी पोलीस पाटील संदीप पांचभाई आणि आकाश वडस्कर यांनी महिलेला अश्लील शिवीगाळ करून सार्वजनिक ठिकाणी तिचा अपमान केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच महिलेच्या मुलालाही शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी २३ नोव्हेंबर रोजी गडचांदूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम २९६, ११५(२) व ३(५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
पोलीस पाटील हे गावपातळीवर शासन आणि पोलीस प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून काम करतात. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध अशा स्वरूपाची तक्रार दाखल होणे ही गंभीर बाब आहे. या प्रकरणाची वरिष्ठ महसूल व पोलीस अधिकाऱ्यांनी निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी. आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास संबंधित पोलीस पाटलाविरुद्ध नियमानुसार कठोर प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.



