शेतातील सोलार पंपाची केबल चोरताना चोरटा रंगेहात पकडला!
रोहणा शिवारात केबल चोरीचा प्रयत्न फसला; दुचाकीसह आरोपी शेतकऱ्याच्या ताब्यात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा : शेतातील विहिरीवर बसविण्यात आलेल्या सोलार पंपाची तसेच वीज जोडणीवरील पंपाची केबल वायर कापून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका आरोपीला शेतकऱ्याने रंगेहात पकडले. ही घटना २० नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास देऊळगाव राजा तालुक्यातील रोहणा शिवारात घडली. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संतोष जनार्धन कदम (वय ४२, रा. रोहणा, ता. देऊळगाव राजा) यांच्या शेतातील विहिरीवर सोलार पंप बसविण्यात आलेला आहे. तसेच वीज जोडणीवरील पंपाचीही व्यवस्था आहे. २० नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास आकाश प्रकाश देवकर (रा. इंदलकरवाडी, ता. जि. जालना) हा त्यांच्या शेतात आला. त्याने विहिरीवरील सोलार पंपाची आणि वीज जोडणीवरील पंपाची केबल वायर कापून चोरी करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, केबल वायर कापून चोरी करत असताना आरोपी आकाश देवकर हा मोटारसायकलसह शेतकऱ्याच्या ताब्यात आला. चोरीसाठी कापण्यात आलेल्या सुमारे ६० फूट केबल वायरची किंमत २ हजार १०० रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. शेतातील साहित्य चोरीला जात असल्याचे लक्षात येताच संबंधित प्रकार उघडकीस आला.
या प्रकरणी संतोष कदम यांनी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात दिलेल्या तोंडी तक्रारीवरून आरोपी आकाश प्रकाश देवकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) व ६२ अन्वये कायम गुन्हा क्रमांक ५२६/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
पोलीस स्टेशनमध्ये मसपोफौ निलीमा जाधव यांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद साळवे करीत आहेत. शेतातील कृषिपंपांच्या केबल चोरीच्या प्रयत्नामुळे शेतकऱ्यांमध्ये सतर्कतेची गरज अधोरेखित झाली आहे..



