साठेगावच्या मातीतील एक तेजस्वी दीप… आज विझला.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
कै. भागोजी गणपत घुगे मामा – हे केवळ एक नाव नव्हतं, तर साठेगावच्या जडणघडणीचा एक जिवंत इतिहास होता. गावाच्या प्रत्येक पानावर त्यांच्या कर्तृत्वाची अक्षरं कोरलेली आहेत.कै. भागोजी घुगे यांचे दिनांक 19 नोव्हेंबर रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले
त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजे _कणखरपणा आणि मायेचा अपूर्व संगम_ होता.
त्यांचा स्वभाव – परखड, निर्भीड, स्पष्टवक्ता आणि तोंडावर बोलणारा. कोणाला राग आला तरी चालेल, पण सत्य आणि कर्तव्याशी कधीही तडजोड करायची नाही, हा त्यांचा अढळ बाणा होता. खोट्याला खोटं आणि खऱ्याला खरं म्हणण्याची हिंमत आजच्या काळात दुर्मिळ झालीय, पण मामा त्यातच जगले.
त्यांचा सरपंचपदाचा सुवर्णकाळ गावातील वडीलधाऱ्यांकडून ऐकलेलं… मामा म्हणजे गावाचा आधारवड होते. एक सक्षम नागरिक म्हणून गावातील प्रत्येकाच्या सुख-दुःखात सगळ्यात पुढे, सगळ्यात आधी धावून जाणारे मामा होते. कोणाचं लग्न असो, कोणाचं संकट असो, मामा तिथे सावलीसारखे उभे असायचेच.
त्यांचं बोलणं म्हणजे निव्वळ शब्द नव्हते, ती एक _प्रेरणा, एक ऊर्जा, एक दिशा_ होती.सेवा निवृत्त मुख्याध्यापक सुनिल घुगे यांचे ते वडील होते.
त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबात 2मुलं, सुना, नातवंडे, असा बराच मोठा आप्त परिवार आहे.



