ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कार्तिकी एकादशी निमित्त श्रीसंत नरहरिनाथमहाराज संस्थान येथे श्रीरुक्मिणी-पांडुरंगाची विशेष महापूजा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

कार्तिकी एकादशीच्या पावन संध्येला श्रीसंत नरहरिनाथमहाराज संस्थान, श्रीक्षेत्र देऊळगावराजा येथे श्रीरुक्मिणी-पांडुरंग देवतेची विशेष महापूजा जालना येथील कालिका स्टील चे सर्वेसर्वा उद्योजक घनश्यामजी गोयल व त्यांच्या सहपरिवाराच्या शुभहस्ते भक्तिभावाने संपन्न झाली.

प.पू.गु.श्री. मोहननाथमहाराज पैठणकर यांचे प्रेरणेने व मार्गदर्शनाने मागील अनेक वर्षांपासून आषाढी एकादशीच्या निमित्त तहसीलदार, देऊळगावराजा यांच्या शुभहस्ते प्रशासकीय महापूजेचे आयोजन करण्यात येत आहे. याच परंपरेच्या पार्श्वभूमीवर यावर्षीपासून श्रीसंत नरहरिनाथमहाराज संस्थानच्या वतीने कार्तिकी एकादशीलाही मान्यवरांच्या शुभहस्ते विशेष महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा शुभारंभ यावर्षी घनश्यामजी गोयल व संपूर्ण गोयल परिवाराच्या शुभहस्ते महापूजा संपन्न होऊन झाला.

महापूजेच्या निमित्ताने गोयल यांनी संस्थानमध्ये सुरू असलेल्या विविध धार्मिक, शैक्षणिक व सेवाभावी उपक्रमांची सविस्तर माहिती घेतली. यामध्ये महर्षि वसिष्ठ वेद विद्यालय, श्रीसंत तुकाराममहाराज वारकरी विद्यालय, कृष्णप्रिया गोशाळा, सिद्धान्तसार ग्रंथालय आदी उपक्रमांचा समावेश होता. संस्थानच्या माध्यमातून वैदिक व वारकरी परंपरेचे संवर्धन, विद्यार्थ्यांना निःशुल्क निवासी शिक्षण तसेच विविध समाजोपयोगी सेवा उपक्रम राबविण्यात येत असल्याबद्दल त्यांनी माहिती जाणून घेतली.

आगामी फेब्रुवारी महिन्यात वसंत पंचमी, दि. ११ फेब्रुवारी २०२७ रोजी सरसंघचालक श्री. मोहनजी भागवत यांच्या उपस्थितीत आयोजित श्रीसंत नरहरिनाथमहाराज त्रिशताब्दी जयंत्युत्सव, प्रथम पदवीदान समारंभ व जीवनगौरव पुरस्कार समारंभाच्या पार्श्वभूमीववर या विशेष महापूजेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आगामी भव्य सोहळ्यासंदर्भातही चर्चा करण्यात आली.

या प्रसंगी श्रीसंत नरहरिनाथमहाराज सेवा समितीचे सर्व सदस्य तसेच श्रीक्षेत्र देऊळगावराजा व पंचक्रोशीतील विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भक्तिमय वातावरणात संपन्न झालेल्या या महापूजेने कार्तिकी एकादशीच्या पावन पर्वाचे औचित्य अधिक मंगलमय झाले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये