एमआयडीसीची मान्यता रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार
सुधीर मुनगंटीवारांच्या भेटीसाठी हजारो शेतकरी एकवटले..! ; विधानसभेत आवाज उठविण्याची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ आमच्या जमिनीवर आमचा हक्क आहे, आमच्या इच्छेविरुद्ध सुपीक शेतजमिनीचा एक इंचही ताबा घेऊ देणार नाही. एमआयडीसीची मान्यता रद्द करा, अशा ठाम आणि भावनिक भूमिकेतून गोंडपिपरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या संघर्षाचा आवाज पुन्हा बुलंद केला आहे. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या एमआयडीसीविरोधी लढ्याला आता नवे बळ मिळाले असून, माजी अर्थमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या भेटीसाठी जवळपास १००० शेतकरी एकत्र आले.केवळ निवेदन देण्यासाठी नव्हे,तर आपल्या पिढ्यान्पिढ्यांच्या जमिनी वाचविण्याची आर्त हाक लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचविण्यासाठी शेतकऱ्यांनी हा मोठा जनसमुदाय उभा केला.
गोंडपिपरी तालुक्यात प्रस्तावित एमआयडीसीमध्ये करंजी, वढोली, चेक पेल्लूर, वडकुली, चेक वडकुली, सिरसी देऊळवार, चेक बेरडी, बोरगाव, धानापूर, चेक बोरगाव, लिखितवाडा आणि खरारपेट या बारा गावांचा समावेश आहे.या भागातील जमीन सुपीक असून शेती हाच हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रमुख आधार आहे. अशा जमिनीवर औद्योगिकीकरणाच्या नावाखाली संकट येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे.
गोंडपिपरी तालुका औद्योगिक कृती संघर्ष समिती आणि शेतकरी एकता संघर्ष समितीने एमआयडीसीची मान्यता रद्द करण्याची मागणी करत आमदार सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन दिले. शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय कोणतीही भूसंपादन प्रक्रिया राबवू नये, हा ठाम आग्रहही त्यांनी मांडला. यापूर्वी आंदोलने, निवेदने आणि न्यायालयीन लढाही उभारण्यात आला असून, न्यायालयाकडून “”स्टेटस_को” मिळाल्याचे समितीने नमूद केले. सध्या जनसुनावणीची प्रक्रिया सुरू आहे. १८ नोव्हेंबरपासून तालुक्यात सर्वेक्षण सुरू झाल्यानंतर संघर्षाने गंभीर वळण घेतले.
शेतकऱ्यांचा विरोध असतानाही जबरदस्तीने मोजणी सुरू असल्याचा आरोप करण्यात आला. यामुळे संतप्त झालेल्या एका शेतकऱ्याने थेट सुधीर मुनगंटीवार यांना फोन करून परिस्थितीची माहिती दिली. त्यावर मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकल्याशिवाय जबरदस्तीने मोजणी करता येणार नाही, अशी भूमिका घेत संबंधित अधिकाऱ्यांना मोजणी थांबविण्याच्या सूचना दिल्या, खडे बोल सुनावले. त्यानंतर तूर्तास सर्वेक्षण थांबले. या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या मनात आपली व्यथा ऐकली जाईल आणि आपल्याला न्याय मिळू शकेल, अशी आशा निर्माण झाली.
याच विश्वासातून २२ नोव्हेंबर रविवारी चिंतलधाबा येथे सुधीर मुनगंटीवार यांच्या नियोजित कार्यक्रमाच्या ठिकाणी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने धाव घेतली. हजारो शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेऊन आपल्या व्यथा, संताप आणि मागण्या मांडल्या. यावेळी शेतकऱ्यांनी एमआयडीसीची मान्यता रद्द करण्याचा मुद्दा विधानसभेत ठामपणे उपस्थित करावा, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे आणि शासनस्तरावर हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी केली. मुनगंटीवार यांनी आठवडाभराच्या आत जिल्हाधिकाऱ्यांसोबत नियोजन भवनात बैठक आयोजित करण्याचे तसेच त्यानंतर उद्योगमंत्र्यांसोबत शेतकऱ्यांची बैठक घडवून आणण्याचे आश्वासन दिले. कोणत्याही शेतकऱ्यावर प्रशासनाकडून जोरजबरदस्ती केली जाणार नाही, असा शब्द देतानाच शेतकऱ्यांच्या भावना आणि निवेदन मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
यावेळी बाराही गावांतील शेतकऱ्यांच्या वतीने औद्योगिक कृती संघर्ष समितीचे उपाध्यक्ष सुरज माडूरवार यांनी प्रास्ताविकातून गावकऱ्यांची शेतकऱ्यांची भूमिका, जमिनीचे महत्त्व आणि एमआयडीसीला असलेला तीव्र विरोध स्पष्टपणे मांडला. शेतकरी एकता संघर्ष समितीचे अध्यक्ष मारोती भोयर, सचिव माधव लडके, सुदर्शन दुर्गे, अमित भसारकर, औद्योगिक कृती संघर्ष समितीचे अध्यक्ष संजय वडसकर, कल्पेश खरबनकर, संदेश निमगडे, गजानन ढवस, संतोष निकोडे यांच्यासह बाराही गावांतील समितीचे पदाधिकारी आणि हजारो शेतकरी उपस्थित होते.
*ऑडिओ क्लिपवर आपुलकी अन् जिव्हाळ्याचा संदेश…*
शेतकरी यांच्याशी झालेल्या संवादादरम्यान आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आपुलकी, प्रेम आणि सहकार्याची भावना व्यक्त केली. “तुमचा विषय माझ्यासाठी आपुलकीचा आहे. तुमच्याविषयी असलेल्या प्रेमाच्या आणि सहकार्याच्या भावनेतूनच मी सर्वांचे फोन उचलतो. मात्र अशा संवादाचे रेकॉर्डिंग करून ते व्हायरल करू नये,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यांच्या या प्रतिक्रियेतून शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबतची वैयक्तिक आस्था आणि संवादातील विश्वास जपण्याची अपेक्षा दिसून आली.
*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपर्यंत तुमच्या भावना पोहोचवणार*
चंद्रपुरात जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक झाल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना एक निश्चित नमुना देण्यात येईल. त्यामध्ये शेतकऱ्यांनी आपला सर्वे क्रमांक, सातबारा उतारा जोडून एमआयडीसीबाबतच्या आपल्या भावना व स्पष्ट भूमिका नोंदवावी. प्रत्येक शेतकऱ्याचा आवाज आणि निर्णय एकत्रित करून हे निवेदन थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्याचा शब्द आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिला.



