ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पैनगंगा – विदर्भ नद्यांच्या संगमावर यादवकालीन इतिहासाची साक्ष

देऊरवाडा येथील संगमेश्वर देवस्थानात कार्तिक पौर्णिमेनिमित्त यात्रा ; हेमाडपंथी मंदिराचे अवशेष आजही अस्तित्वात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

कोरपना – पैनगंगा आणि विदर्भा या दोन नद्यांच्या पवित्र संगमावर वसलेले, कोरपना येथून जवळच असलेले देऊरवाडा त.वणी येथील संगमेश्वर देवस्थान ऐतिहासिक, धार्मिक आणि नैसर्गिक वारशाचा अनोखा ठेवा जपून आहे. यादवकालीन हेमाडपंथी मंदिराची साक्ष देणारे अवशेष, प्राचीन मूर्ती आणि निसर्गरम्य संगमस्थळ यामुळे या देवस्थानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कार्तिक पौर्णिमेनिमित्त येथे दरवर्षी यात्रा भरत असून कोरपना, वणी आणि झरी तालुक्यांतील भाविकांची मोठी मांदियाळी जमते.

इतिहास संशोधक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील प्राचीन मंदिर यादवकालीन हेमाडपंथी स्थापत्यशैलीशी संबंधित होते. मात्र काळाच्या ओघात मूळ मंदिर नामशेष झाले. आजही परिसरात शिवलिंग, भगवान गणेश, लक्ष्मीनारायण, हनुमान आदी देवतांच्या प्राचीन मूर्ती विखुरलेल्या अवस्थेत आढळतात. या मूर्ती आणि अवशेष या परिसराच्या समृद्ध ऐतिहासिक वारशाची साक्ष देतात.

निसर्गाचा अनोखा आविष्कार ‘हत्ती गोटा’

विदर्भा नदीपात्रात ‘हत्ती गोटा’ या स्थानिक नावाने प्रसिद्ध असलेला नैसर्गिक अखंड पाषाण हे येथील आणखी एक आकर्षण आहे. पावसाळ्यात या पाषाणावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे धबधब्याचे मनोहारी दृश्य निर्माण होते. मंदिर परिसरात पूर्वी तेली महाराजांचे वास्तव्य होते. त्यांची समाधीही याच ठिकाणी आहे.

ग्रामस्थांच्या पुढाकारातून देवस्थानाचा जीर्णोद्धार

सन २००० मध्ये नदीपलीकडील कोरपना तालुक्यातील कोडशी बुज येथील ग्रामस्थांनी एकत्र येत संगमेश्वर देवस्थान समितीची स्थापना केली. त्यानंतर मंदिराचा जीर्णोद्धार करून आधुनिक स्वरूप देण्यात आले. मंदिर परिसर सुरेश पाटील मालेकर यांच्या शेतालगत आहे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी येथे लाह्या आणि पोह्यांचा काला आयोजित केला जातो, अशी माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष सुरेश मालेकर यांनी दिली.

पायाभूत सुविधांअभावी विकास रखडला

चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या या देवस्थानाला दोन बाजूंनी नद्यांनी वेढले आहे. त्यामुळे भाविकांना ये-जा करण्यासाठी पक्का रस्ता आणि नदीवर पुलाची नितांत गरज आहे. याशिवाय वीज, पिण्याचे पाणी, मंदिर परिसराचे सौंदर्यीकरण आणि ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा, अशी मागणी भाविकांकडून होत आहे.

चंद्रपूर तालुक्यातील वढा येथील विठ्ठल-रुक्माई देवस्थानाप्रमाणेच संगमेश्वर देवस्थानातही कार्तिक पौर्णिमेला यात्रा भरते. ऐतिहासिक वारसा, धार्मिक श्रद्धा आणि निसर्गसौंदर्याचा संगम असलेल्या या स्थळाचा योग्य विकास झाल्यास ते विदर्भातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आणि पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास येऊ शकते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये