चंद्रपूर जिल्हा कारागृह वर्ग-०१ जागतिक माहिती अधिकार दिन निमित्त कायदे विषयक मार्गदर्शन
चंद्रपूर जिल्हा कारागृहात आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा

चांदा ब्लास्ट
माहितीचा अधिकार कायदा मुलभुत मानवाधिकार जोपासणारा आहे!
मुख्य लोक अभिरक्षक अॅड. विनोद बोरसे यांचे प्रतिपादन
चंद्रपूर :_ ज्याप्रमाणे भारतीय संविधान आणि मानवाधिकार कायदा यांच्या माध्यमातून नागरीकांचे हक्क जोपासले गेलेले आहेत त्याप्रमाणे माहितीचा अधिकार कायदा २००५ हा कायदा देखील नागरीकांचे मुलभुत मानवाधिकार जोपासणारा आहे. असे प्रतिपादन चंद्रपूर जिल्हा न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत असलेल्या लोक अभिरक्षक कार्यालयाचे मुख्य लोक अभिरक्षक अॅड. विनोद बोरसे यांनी केले.
चंद्रपूर जिल्हा कारागृहात जागतिक माहिती अधिकार दिनानिमित्त न्यायबंदयांकरीता आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात “माहितीचा अधिकार कायदयाचे महत्व” या विषयावर जनजागृतीपर कार्यक्रमात अॅड. विनोद बोरसे बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कारागृहाचे अधीक्षक श्री अनुपकुमार कुमरे, हे उपस्थित होते.
अॅड. विनोद बोरसे यांनी आपल्या मार्गदर्शनात पुढे सांगितले की, माहितीचा अधिकार कायदा पारित करणारे महाराष्ट्र राज्य हे देशातील पहिले राज्य असून संपूर्ण जगभरात २८ सप्टेंबर हा दिवस जागतिक माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जात असतो. पारदर्शकता, नागरीकांचे अधिकार, वेळमर्यादा तसेच जन माहिती अधिकारी पदाची निर्मिती आदी बाबींमुळे या कायदयाला खुप महत्व आहे. त्यामुळे या कायदयाचा अधिकाधिक उपयोग मुलभूत हक्कांचे संवर्धनासाठी व जन हितासाठी झाला पाहिजे असे मार्गदर्शन त्यांनी उपस्थित न्यायबंदयांना केले. यावेळी ४२३ बंदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन कारागृह शिक्षक श्री संजीव हटवादे यांनी केले.
सदर कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी वरीष्ठ तुरुंगाधिकारी, श्री कमलाकर मिराशे, सुभेदार श्री शिवशंकर खंडारे, श्री सत्यानंद दुबे, हवालदार श्री सचिन बोरकर, कारागृह शिपाई संदिप भुसारी आदी कर्मचारी यांनी सहकार्य केले,



