तेलंगणा जाणाऱ्या राज्य मार्गाचे काम कासवगतीने!
प्रवाशांसह विद्यार्थ्यांचे हाल, प्रशासनाचे दुर्लक्ष.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी तालुक्यातील गोंडपिपरी–धाबा–पोडसा तेलंगाणा जोडणारा राज्य मार्ग हा परिसरातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा दुवा मानला जातो. या मार्गाचे काम जवळपास दोन वर्षांपूर्वी पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले असले तरी गोंडपिपरी शहरालगतचा काही अंतराचा भाग अद्यापही अपूर्ण अवस्थेत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या उर्वरित कामाला सुरुवात झाली असली, तरी कामाची गती अत्यंत मंद असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सदर मार्ग आधीच अरुंद असून त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक चालते. अशा परिस्थितीत रस्त्याच्या दुरुस्तीचे काम जलदगतीने पूर्ण होणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात मात्र काम कासवगतीने सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे आणि संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे सामान्य नागरिकांना दररोज प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे.
गेल्या महिनाभरापासून रस्त्याच्या अर्ध्यापेक्षा अधिक भागावर गिट्टी व रेतीचे ढिगारे टाकून ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना रस्त्यावरून मार्ग काढणे अवघड झाले असून अपघाताचा धोका वाढला आहे. शहरात ये-जा करणाऱ्या नागरिकांसह शेतकरी, व्यापारी आणि विद्यार्थ्यांनाही याचा मोठा फटका बसत आहे. “या कामाकडे संबंधित विभाग कधी लक्ष देणार?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
*परीक्षा काळात विद्यार्थ्यांची अडचण*
सध्या शाळांमध्ये वार्षिक परीक्षा सुरू होत्या, अशा महत्त्वाच्या काळात रस्त्याचे काम सुरू असल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. रस्त्याची बिकट अवस्था आणि सुरू असलेल्या कामामुळे अनेकदा बस सेवा बंद ठेवन्यात आली. परिणामी, विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत पोहोचणे कठीण झाले आणि त्याचा परिणाम काही विद्यार्थ्यांच्या परीक्षांवरही झाला असल्याची माहिती समोर आली आहे. पालकांमध्ये याबाबत तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.
*VIP साठीच रस्ता सुरळीत..?*
या मार्गाच्या कामातील दिरंगाईबाबत आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून रखडलेल्या या कामाकडे कोणीही गांभीर्याने पाहत नसताना, आमदार देवराव भोंगळे आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या धाबा भेटीची माहिती मिळताच अचानक रस्त्यावर रोड रोलर फिरवून तात्पुरती डागडुजी करण्यात आली. काही वेळासाठी रस्ता सुरळीत करण्यात आला; मात्र दौरा संपताच पुन्हा रस्त्याची पूर्वीचीच बिकट अवस्था निर्माण झाली. यामुळे “सामान्य जनतेसाठी खड्डे आणि VIP साठी गुळगुळीत रस्ता, हा कुठला न्याय?” असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. प्रशासन आणि ठेकेदार यांच्या कार्यपद्धतीवर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
*जलदगतीने काम पूर्ण करण्याची मागणी*
दरम्यान, नागरिकांनी संबंधित विभागाने या कामाची तातडीने दखल घेऊन रस्त्याचे काम जलदगतीने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावे, अशी मागणी केली आहे. अन्यथा भविष्यात मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशाराही देण्यात येत आहे. गोंडपिपरी शहराच्या विकासासाठी आणि सुरक्षित वाहतुकीसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा असल्याने, प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत सर्वसामान्य नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.



