ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोंभूर्णा येथे गोंडवाना आंदोलन आदिवासी चळवळ संघटनेची बैठक संपन्न

वनहक्क, गोंडी शिक्षण व आदिवासी संस्कृती संवर्धनावर सविस्तर चर्चा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर

पोंभूर्णा, प्रतिनिधी : येथील वीर बाबुराव शेडमाके सभागृहात गोंडवाना आंदोलन आदिवासी चळवळ संघटनेच्या वतीने आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार तथा उपप्रकल्प अधिकारी गिरीश पोळ यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

बैठकीत सामूहिक व वैयक्तिक वनहक्क दावे, आदिवासींसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना, शिक्षण, रोजगार, आरोग्य, सामाजिक विकास तसेच इको पार्क सौंदर्यीकरण यांसारख्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रलंबित वनहक्क दावे तातडीने निकाली काढण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

आदिवासी शासकीय आश्रमशाळांमध्ये गोंडी भाषेचे शिक्षण सुरू करणे, आदिवासी संस्कृती, परंपरा, इतिहास व लोककलांचे जतन आणि संवर्धन करण्याबाबतही बैठकीत महत्त्वपूर्ण विचारमंथन झाले. विद्यार्थ्यांना मातृभाषेत शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाने सकारात्मक पावले उचलावीत, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.

प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार व उपप्रकल्प अधिकारी गिरीश पोळ यांनी गोंडी भाषा शिक्षण, आदिवासी संस्कृती संवर्धन आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी आवश्यक बाबी शासनस्तरावर विचारात घेऊन पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

बैठकीत पर्यटन विकास, स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा, शिष्यवृत्ती योजना, वसतिगृहांच्या समस्या तसेच आदिवासी भागातील मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा यांबाबतही चर्चा करण्यात आली.

यावेळी संघटनेचे प्रमुख जगन येलके, सचिव हरिचंद्र कोडापे, गणेश परचाके, रमेश वेलादी, दर्शन शेडमाके, प्रेमदास इश्टाम, बंडू शेडमाके, कवडू मडावी, विजू तलांडे, गीताताई कुळमेथे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व आदिवासी बांधव उपस्थित होते.

बैठकीदरम्यान गोंडवाना आंदोलन आदिवासी चळवळ संघटनेच्या वतीने प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार तथा उपप्रकल्प अधिकारी गिरीश पोळ यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. आदिवासी समाजाच्या विकासासाठी प्रशासन सदैव तत्पर राहील व विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही यावेळी अधिकाऱ्यांनी दिली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये