जिल्ह्यात 1 लाख 51 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 5 हजार जमा
आतापर्यंत 75 कोटी 50 लाख खात्यात ; 1 लाख 88 हजार शेतकऱ्यांचे खाते स्वीकृत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा : कमी पर्जन्यमान आणि भूगर्भातील कमी जलसाठ्यामुळे यावर्षी दुष्काळस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. कमी पर्जन्यमानाचा खरीप पिकांवर देखील परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दिवाळीपूर्वी प्रत्येकी 5 हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार आतापर्यंत 1 लाख 51 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे.
एलनिनोच्या प्रभावामुळे यावर्षी पर्जन्यमान कमी झाले. त्याचा परिणाम कापुस, सोयाबिन, तुरसह अन्य पिकांवर झाला. बहुतांश भागात शेतकऱ्यांना उत्पन्नात घट आली. पुढे रब्बी आणि उन्हाळी पिकांवर देखील विपरीत परिणाम होणार आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने दुष्काळी परिस्थिती जाहीर करून उपाययोजना सुरु केल्या आहे. त्यात विविध दिलासादायक बाबींचा समावेश आहे.
दुष्काळीस्थितीमुळे हवालदीन शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा देण्यासाठी शासनाने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 5 हजार रुपये जमा करण्याची घोषणा केली होती. जिल्ह्यात दिनांक 2 नोव्हेंबर पासून शेतकऱ्यांच्या आधारलिंक खात्यात रक्कम जमा केली जात आहे.
तालुका व जिल्हास्तरावर आतापर्यंत 1 लाख 88 हजार 197 शेतकऱ्यांची खाती स्विकृत करण्यात आली आहे. त्यापैकी 1 लाख 51 हजार खात्यांमध्ये प्रत्येकी 5 हजार याप्रमाणे 75 कोटी 50 लाख रुपये जमा करण्यात आले आहे. अद्याप खाते स्विकृती व रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरुच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ होणार आहे.
आतापर्यंत रक्कम जमा करण्यात आलेल्या शेतकऱ्यांची तालुकानिहाय संख्या पुढील प्रमाणे आहे. आर्वी तालुका 17,197 शेतकरी 8,59,85,000, आष्टी तालुका 11,525 शेतकरी 5,76,25,000, देवळी तालुका 19,582 शेतकरी 9,79,10,000, हिंगणघाट 28,091 शेतकरी 14,04,55,000, कारंजा तालुका 15,190 शेतकरी 7,59,50,000, समुद्रपुर तालुका 26,202 शेतकरी 13,10,10,000, सेलू तालुका 17,896 शेतकरी 8,94,80,0000, वर्धा तालुका 15,107 शेतकरी 7,55,35,000 याप्रमाणे रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे.



