ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रास्तभाव दुकानदाराच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थ आक्रमक!

शिधावाटपात अनियमिततेचा आरोप; परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :_ रास्तभाव दुकानातून शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या स्वस्त धान्याचे नियमित व योग्य वितरण होत नसल्याचा आरोप करीत घडोली येथील संबंधित दुकानदाराविरोधात ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शिधावाटपातील कथित अनियमितता आणि लाभार्थ्यांना होणाऱ्या त्रासाची गंभीर दखल घेऊन संबंधित रास्तभाव दुकानदार शंकर गुलाब कनाके यांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करावा, अशी मागणी जिल्हा पुरवठा अधिकारी, चंद्रपूर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनातील माहितीनुसार, घडोली येथील संबंधित रास्तभाव दुकानदार अनेक वर्षांपासून लाभार्थ्यांना शासनाच्या नियमानुसार धान्याचे वितरण करीत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. दुकानात धान्य उपलब्ध नसल्याचे सांगणे, लाभार्थ्यांना वारंवार चकरा मारायला लावणे तसेच धान्य वितरणाबाबत समाधानकारक उत्तरे न देणे, अशा तक्रारी ग्रामस्थांनी केल्या आहेत.

या प्रकारामुळे विशेषतः महिला व पुरुष लाभार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद आहे. मागील १५ ते १६ वर्षांपासून या समस्येबाबत शासनाच्या विविध स्तरांवर चार ते पाच वेळा तक्रारी करूनही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.

एप्रिल २०२६ मध्येही लाभार्थ्यांना धान्यवाटप न करता धान्याची परस्पर विल्हेवाट लावल्याचा गंभीर आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. या प्रकरणी १३ ऑक्टोबर २०२६ रोजी तहसील कार्यालय, गोंडपिपरी येथेही निवेदन देऊन तक्रार करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

*प्रशासनाने चौकशी करून कारवाई करावी*

शिधावाटप हा गरजू आणि गरीब कुटुंबांच्या अन्नसुरक्षेशी संबंधित महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे या प्रकरणाची केवळ कागदोपत्री दखल न घेता प्रत्यक्ष चौकशी करावी. धान्य वितरणाच्या नोंदी, ई-पॉस प्रणालीतील व्यवहार आणि लाभार्थ्यांच्या तक्रारींची पडताळणी करून दोषी आढळल्यास संबंधित दुकानदाराचा परवाना कायमस्वरूपी रद्द करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

आता जिल्हा पुरवठा विभाग या तक्रारीची कितपत गांभीर्याने दखल घेतो आणि संबंधित रास्तभाव दुकानाची चौकशी करून काय कारवाई करतो, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये