सर्वधर्मसमभावाचा देव हा राष्ट्रसंतांचा गुरुदेव : डॉ धनराज खानोरकर
तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रह्मपुरी :- “वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी खंजेरी भजनाने सारा भारत देश जिंकला.जपानपर्यंत या खंजेरीच्या बादशाहाने आपल्या भजनाने लोकजागृती केली. राष्ट्रनिष्ठा,विज्ञाननिष्ठ, धर्मनिरपेक्षता आणि ग्रामस्वराज्यासाठी ते शेवटपर्यंत झटले. भजन,प्रवचन,ग्रामगीतेच्या माध्यमातून ग्रामरक्षण, स्वयंपूर्णता,महिलोन्नती, ग्रामस्वच्छता,ग्रामस्वराज्यावर सुंदर विवेचन केले. त्यांच्या प्रेरणेने अनेक गाव स्वयंपूर्ण झाली.महाराज सर्वधर्माचे माहेर होते.सर्वधर्माचा देव हा राष्ट्रसंतांचा गुरुदेव होता.”असे काव्यमय विवेचन प्रसिद्ध वक्ते,कवी, लेखक डॉ धनराज खानोरकर यांनी केले.ते येथील कुर्झा वार्डातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथीनिमित्त पुतळयाच्या अनावरणाप्रसंगी बोलत होते.
सर्वप्रथम उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते रानपाट रोड,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौकातील मूर्तिकार डूबा लाखेंनी बनविलेल्या पुतळयाचे अनावरण करण्यात आले.याप्रसंगी माजी नगरसेवक विलास विखार,दीपकभाऊ उराडे,नगरसेवक चंद्रकांत बावनकुळे, नगरसेवक प्रकाश खोब्रागडे, नगरसेविका तलमले, सुनिल विखार,नितीन आंबोरकर,प्रा शंकर लांजेवार,साखरकर,रविंद्र उराडे,उमेश बावनकुळे, प्रकाश बावनकुळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी अनेकांनी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त शुभेच्छा प्रदान केल्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोकुल सहारे,मोहनिश उराडे तर आभार किरण फटिंगनी मानले. कार्यक्रमासाठी वार्डातील गुरुदेव भक्तांनी गर्दी केली होती.



