वर्धा सांस्कृतिक महोत्सव २०२६ च्या भूमिपूजन सोहळ्याचा उत्साहात शुभारंभ!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा :_ शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या बहुप्रतीक्षित ‘वर्धा सांस्कृतिक महोत्सव २०२६’ च्या मंडप पूजन व भूमिपूजन सोहळ्याचा शुभारंभ आज मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात पार पडला.
वर्धा सांस्कृतिक महोत्सव मैदान, स्वावलंबी विद्यालय, वर्धा येथे विधिवत पूजन करून महोत्सवाच्या तयारीला अधिकृत सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले तसेच महोत्सव यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
यंदा दिनांक १९ ते २४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत वर्धा सांस्कृतिक महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवामध्ये लाइव्ह कॉन्सर्ट, सेलिब्रिटी शो, विविध मनोरंजक स्पर्धा, भव्य एक्स्पो, आकर्षक खाद्यपदार्थांचे दालन तसेच व्यावसायिक स्टॉल्सची रेलचेल असणार आहे.
स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, नवोदित कलागुणांना प्रोत्साहन देणे, व्यावसायिकांना संधी निर्माण करणे आणि वर्ध्याच्या सांस्कृतिक परंपरेला नवी ओळख मिळवून देणे, हा या महोत्सवाचा प्रमुख उद्देश आहे.
भूमिपूजन सोहळ्याने महोत्सवाच्या तयारीला उत्साहाचे नवे बळ मिळाले असून, आगामी सहा दिवस वर्धेकरांसाठी मनोरंजन, कला आणि संस्कृतीची एक अविस्मरणीय पर्वणी ठरणार आहेत.
*वर्धेकरांनी या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊन वर्ध्याच्या सांस्कृतिक उत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन मोहित सहारे,श्रेयश गिरमकर,पराग पिंपळे,नयन जांभूळकर,अमित लोकडे,रागिणी ठाकरे,यश भुत,प्रणव साठोने,भुवन राउत,अभिमन्यू साळुखे,आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
वर्धा सज्ज आहे… सांस्कृतिक जल्लोषासाठी!



