युनियनच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना ओबीसी आयोगाचे अध्यक्ष माननीय हंसराज जी अहिर यांच्या मार्गदर्शनाला महत्वपूर्ण यश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपणा दालमिया सिमेंट कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या बोनसचा प्रश्न अखेर यशस्वीरीत्या मार्गी लागला आहे. नारंडा सिमेंट कामगार संघ शाखा दालमिया संघाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना, प्रभावी नेतृत्वाला आणि व्यवस्थापनासोबत झालेल्या अनेक चर्चांना यश आले असून, कर्मचाऱ्यांना १० टक्के बोनस देण्यावर सहमती झाली आहे. विशेष म्हणजे, दिवाळीपूर्वीच बोनसची रक्कम अदा करण्याचे आश्वासनही व्यवस्थापनाने दिले आहे. कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने युनियनचे हे महत्त्वपूर्ण यश मानले जात आहे.
नारंडा सिमेंट कामगार संघ दालमिया सिमेंट प्रमुख मागणी कर्मचाऱ्यांना सध्या मिळणारा ८.३३ टक्के बोनस वाढवून २० टक्के करण्यात यावा, अशी होती. कर्मचाऱ्यांची मेहनत, समर्पण आणि कंपनीच्या प्रगतीतील योगदानाचा योग्य सन्मान व्हावा तसेच त्यांना अधिक आर्थिक लाभ मिळावा, हा या मागणीमागील उद्देश होता. यासाठी युनियनच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. व्यवस्थापनासोबत अनेक महत्त्वपूर्ण बैठका आणि सविस्तर चर्चा करण्यात आल्या. युनियनच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना आणि सकारात्मक भूमिकेला प्रतिसाद देत व्यवस्थापनाने अखेर १० टक्के बोनस देण्यास सहमती दर्शविली.
या महत्त्वपूर्ण यशामध्ये युनियनचे अध्यक्ष खुशाल भाऊ बोंडे, उपाध्यक्ष नथू पाटील बोबडे, सचिव साईनाथ सोनटक्के, प्रवीण हेकाड, दत्ता कोल्हे, प्रमोद उलमाले, हनुमंत कुसले, समीर वांढरे, देवेंद्र शेरकि, राहुल केलूरकर, अंकुश वांडरे ,सुनील पायपरे, साईनाथ आकुलवार ,यांच्यासह इतर पदाधिकारी व सदस्यांची सक्रिय भूमिका राहिली. सर्वांनी एकजुटीने कर्मचाऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत बोनसचा प्रश्न प्रभावीपणे व्यवस्थापनासमोर मांडला.या यशाचे संपूर्ण श्रेय युनियनचे अध्यक्ष खुशाल भाऊ बोंडे यांना देण्यात आले. त्यांचे मोलाचे मार्गदर्शन, आशीर्वाद, कुशल नेतृत्व आणि सातत्यपूर्ण सहकार्य यामुळेच हे यश संपादन करणे शक्य झाल्याची भावना युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली युनियनने संघटितपणे प्रयत्न करून कर्मचाऱ्यांच्या हिताचा हा महत्त्वपूर्ण निर्णय घडवून आणला.
या निमित्ताने युनियनच्या सर्व पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने खुशाल भाऊ बोंडे यांच्याप्रति मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. तसेच हे यश संघटनेची एकजूट, प्रभावी नेतृत्व, सामूहिक प्रयत्न आणि कामगारांच्या हिताप्रती असलेल्या कटिबद्धतेचे फलित असल्याचे युनियनच्या वतीने सांगण्यात आले.



