ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गडचिरोली–शिरपूर रेल्वेमार्गासाठी गोंडपिपरी तालुक्यात भूसंपादनाला वेग!

१९ गावांतील जमिनींची माहिती संकलित करण्याचे प्रशासनाचे निर्देश; तलाठ्यांकडून गाव नमुना ७/१२ सह आवश्यक अभिलेख मागविले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :_ गडचिरोली–शिरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्गाच्या निर्मितीच्या दृष्टीने गोंडपिपरी तालुक्यातील १९ गावांमध्ये भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. रेल्वे प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमिनींच्या संपादनाच्या अनुषंगाने प्रशासनाने प्राथमिक हालचाली सुरू केल्या असून, संबंधित गावांतील जमिनींची सविस्तर माहिती संकलित करण्याचे निर्देश तहसीलदारांना देण्यात आले आहेत. त्यामुळे या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पाच्या कामाला प्रशासकीय स्तरावर गती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर कार्यालयाकडून प्राप्त पत्र तसेच जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांच्या निर्देशानुसार ही कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाच्या मागणीनुसार गोंडपिपरीचे तहसीलदार यांनी संबंधित तलाठी आणि भूसंपादन अधिकाऱ्यांना अधिकृत पत्र पाठवून आवश्यक अभिलेख उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे.

*१९ गावांतील जमिनींचा होणार समावेश*

गोंडपिपरी तालुक्यातील खालील १९ गावांमधील जमिनींची माहिती संकलित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सोनापूर देशपांडे, चक दरूर, चेक वेडगाव, भंगाराम तळोधी, भंगारपेठ, विठ्ठलवाडा, किरमीरी, धामणगाव, येनबोथला, वेडगाव, दरूर, सकमूर, हिरापूर, अडेगाव, चक नवेगाव, चक विठ्ठलवाडा, चक नांदगाव, चकबापूर, तारसा खुर्द या गावांमधील रेल्वे मार्गासाठी प्रस्तावित जमिनींचे सर्वेक्षण आणि अभिलेख संकलन करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे.

*जमिनींचे क्षेत्रफळ, सर्वे क्रमांक व मालकांची माहिती संकलित*

संबंधित गावांमधील जमिनींचे सर्वे क्रमांक, क्षेत्रफळ, जमिनीचा प्रकार तसेच जमीनधारकांची नावे यासह आवश्यक तपशील प्रशासनाला उपलब्ध करून द्यावा लागणार आहे. यासाठी गाव नमुना ७/१२ उताऱ्यासह आवश्यक महसुली अभिलेख विहित नमुन्यात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रेल्वे प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमिनींची प्राथमिक माहिती उपलब्ध झाल्यानंतर भूसंपादनासंदर्भातील पुढील प्रशासकीय कार्यवाही केली जाणार आहे. त्यामुळे संबंधित गावांतील शेतकरी आणि जमीनमालकांचे या प्रक्रियेकडे लक्ष लागले आहे.

*शेतकऱ्यांच्या जमिनींच्या मोबदल्याचा मुद्दा महत्त्वाचा*

रेल्वे मार्गासाठी जमीन संपादित करताना संबंधित शेतकरी आणि जमीनमालकांना कायद्यानुसार योग्य मोबदला मिळणे, जमिनीचे अचूक मूल्यांकन होणे आणि संपादन प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविणे आवश्यक आहे. जमिनींचे क्षेत्रफळ, जमिनीचा प्रकार, मालकी हक्क आणि इतर महसुली नोंदींची अचूक पडताळणी होणे महत्त्वाचे ठरणार आहे. विशेषतः या प्रक्रियेत शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांना आवश्यक माहिती देणे, जमिनीच्या मूल्यांकनाबाबत स्पष्टता ठेवणे आणि कायदेशीर तरतुदींचे पालन करणे प्रशासनासमोरील महत्त्वाचे आव्हान असेल.

*रेल्वे प्रकल्पाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल*

गडचिरोली–शिरपूर रेल्वेमार्ग हा परिसराच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रकल्प मानला जात आहे. या रेल्वेमार्गामुळे भविष्यात ग्रामीण भागातील वाहतूक, व्यापार, उद्योग, रोजगार आणि आर्थिक विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी भूसंपादनाची प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे. सध्या १९ गावांतील जमिनींची माहिती संकलित करण्याची प्राथमिक प्रशासकीय प्रक्रिया सुरू झाली असून, त्यानंतरच्या भूसंपादनविषयक कार्यवाहीकडे संबंधित गावांतील नागरिकांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे गडचिरोली–शिरपूर रेल्वेमार्गाच्या अनुषंगाने गोंडपिपरी तालुक्यात प्रशासकीय हालचालींना वेग आल्याचे चित्र आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये