दिवाळीपूर्वी ३२ आशा स्वयंसेविकांचे आंदोलन तीव्र; रात्रभर रस्त्यावरच काढली रात्र
कोविड काळातील २२ महिन्यांच्या थकीत प्रोत्साहन भत्त्याच्या मागणीसाठी घुग्घूस नगर परिषदेविरोधात बेमुदत धरणे आंदोलन सुरू

चांदा ब्लास्ट
घुग्घूस, चंद्रपूर : दिवाळीचा सण अगदी जवळ आला असून सर्वत्र रोषणाई आणि आनंदोत्सवाची तयारी सुरू आहे. मात्र, दुसरीकडे घुग्घूस येथील ३२ आशा स्वयंसेविकांना आपल्या हक्काच्या थकीत प्रोत्साहन भत्त्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागत आहे. कोविड-१९ महामारीच्या काळात केलेल्या कामाचा २२ महिन्यांचा थकीत प्रोत्साहन भत्ता मिळावा, या मागणीसाठी ४ नोव्हेंबर २०२६ पासून घुग्घूस नगर परिषदेविरोधात स्थानिक साप्ताहिक बाजार येथील रंगमंचावर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी, ५ नोव्हेंबर रोजीही आशा स्वयंसेविकांचे धरणे आंदोलन सुरूच आहे. दिवाळीच्या तोंडावर या महिलांना रात्रभर आंदोलनस्थळी रस्त्यावरच मुक्काम करावा लागला. आंदोलनात सहभागी काही महिलांच्या घरी लहान मुले आहेत, तर काही महिला रक्तदाब आणि मधुमेह यांसारख्या आरोग्यविषयक समस्यांनी त्रस्त आहेत. असे असतानाही आपल्या न्याय्य मागण्यांसाठी त्या आंदोलनावर ठाम आहेत.
आशा स्वयंसेविकांच्या म्हणण्यानुसार, कोविड-१९ महामारीच्या कठीण काळात स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्याची चिंता न करता त्यांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण, आरोग्यविषयक जनजागृती, नागरिकांची माहिती संकलित करणे तसेच आरोग्य विभागाच्या विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यावेळी २४ महिन्यांसाठी दरमहा १ हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचे सांगण्यात आले होते. मात्र, त्यांना केवळ दोन महिन्यांचा भत्ता मिळाला असून उर्वरित २२ महिन्यांची रक्कम अद्याप मिळालेली नसल्याचा त्यांचा दावा आहे. या प्रकरणाला जवळपास पाच वर्षे उलटूनही अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही.
या संदर्भात यापूर्वीही प्रशासनाला निवेदने देण्यात आली होती. १२ ऑक्टोबर रोजी १५ दिवसांची, तर २७ ऑक्टोबर रोजी सात दिवसांची मुदत देऊन मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र, तरीही कोणताही ठोस निर्णय न झाल्याने अखेर ४ नोव्हेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले.
लोकप्रतिनिधींकडून उद्धट वर्तन केल्याचा आरोप
आंदोलनकर्त्या महिलांचा आरोप आहे की, आंदोलनस्थळी भेट देण्यासाठी आलेल्या घुग्घूस येथील एका लोकप्रतिनिधींनी त्यांच्याशी कथितरीत्या उद्धट भाषा वापरून ‘अरे-तुरे’ पद्धतीने संवाद साधला. आपल्या मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या महिलांशी सन्मानपूर्वक संवाद साधला पाहिजे, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली आहे.
आजाद समाज पार्टीचे विदर्भ सचिव सुरेश मल्हारी पाईकराव यांनी आरोप केला की, एका लोकप्रतिनिधींनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलनकर्त्यांशी वाद घालण्याचा आणि आंदोलन कमकुवत करण्याचा प्रयत्न केला. आशा स्वयंसेविका कोणाकडे भीक मागत नसून त्यांनी केलेल्या मेहनतीचा आणि सेवेचा मोबदला म्हणून आपल्या हक्काची रक्कम मागत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
पाईकराव यांनी पुढे आरोप केला की, नगराध्यक्षा आणि मुख्याधिकारी एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत. नगराध्यक्षांकडून मुख्याधिकाऱ्यांवर, तर मुख्याधिकाऱ्यांकडून नगराध्यक्षांवर भत्ता अदा न करण्याची जबाबदारी टाकली जात असल्याचे सांगितले जात आहे. मग आशा स्वयंसेविकांच्या थकीत रकमेचा प्रश्न अद्याप का सुटत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू
आजाद समाज पार्टीचे विदर्भ सचिव सुरेश मल्हारी पाईकराव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा महासचिव रिताताई फकरु देशकर यांच्या नेतृत्वात ३२ आशा स्वयंसेविकांकडून हे आंदोलन करण्यात येत आहे.
कोविड काळातील २२ महिन्यांचा थकीत प्रोत्साहन भत्ता तातडीने अदा करावा आणि आंदोलनात सहभागी महिलांशी सन्मानपूर्वक वागणूक द्यावी, या प्रमुख मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत.
तसेच आंदोलन संपेपर्यंत रात्रीच्या वेळीही आंदोलनस्थळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा, अशी विनंती सुरेश पाईकराव यांनी पोलीस प्रशासनाला केली आहे.
जोपर्यंत आपल्या मागण्यांबाबत लेखी स्वरूपात ठोस निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत बेमुदत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आशा स्वयंसेविकांनी व्यक्त केला आहे.
कोविडसारख्या कठीण काळात इतरांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून सेवा देणाऱ्या आशा स्वयंसेविकांना आज स्वतःच्या मेहनतीचा मोबदला मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर नगर परिषद आणि प्रशासन या महिलांच्या मागण्यांबाबत कोणता निर्णय घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



