ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

इको-प्रो भद्रावतीतर्फे पक्षी निरीक्षण व जनजागृती सप्ताहाला सुरुवात

वरद विनायक गवराळा तलाव व परिसराची स्वच्छता करून सप्ताहाचे उद्घाटन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

          पद्मभूषण डॉ. सलीम अली तसेच सेवानिवृत्त वनाधिकारी मारुती चितमपल्ली यांनी पक्षी संवर्धनासाठी केलेल्या अमूल्य कार्याची दखल घेत त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून दरवर्षी ५ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत पक्षी सप्ताहाचे आयोजन करण्यात येते.

याच अनुषंगाने इको-प्रो भद्रावतीतर्फे गुरुवार, ५ नोव्हेंबर रोजी गवराळा तलाव परिसरात स्वच्छता अभियान राबवून पक्षी निरीक्षण व जनजागृती सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले.

या सप्ताहादरम्यान भद्रावती परिसरातील विविध तलावांवर पक्षी निरीक्षण व जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. कार्यक्रमाचे नियोजन व सप्ताहातील कार्यक्रमांचे वेळापत्रक हे दि. ६ नोव्हेंबर घोटनिंबाळा तलाव, ७ नोव्हेंबर चोरा तलाव, ८ नोव्हेंबर चित्रकला स्पर्धा हुतात्मा स्मारक भद्रावती, ९ नोव्हेंबर सुमठाणा तलाव, १० नोव्हेंबर डोलारा तलाव, ११ नोव्हेंबर गोरजा तलाव असे असुन १२ नोव्हेंबर ला समारोप व बक्षीसवितरणाचा कार्यक्रम हुतात्मा स्मारक भद्रावती इथे होणार आहे.

या सर्व उपक्रमांचे आयोजन दररोज सकाळी ६ ते ८.३० या वेळेत करण्यात येणार आहे. पक्षी निरीक्षणासोबतच निसर्गातील पक्ष्यांचे महत्त्व, संकटग्रस्त पक्षी व त्यांचे अधिवास संवर्धन, स्थलांतरित पक्ष्यांच्या अधिवासाचे संरक्षण तसेच पक्षी संरक्षण व संवर्धन कायद्याविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.

हिवाळ्याची चाहूल लागताच विविध भागांतून अनेक प्रवासी पक्षी आपल्या परिसरात दाखल होतात. वर्षभर नजरेआड असणाऱ्या या रंगीबेरंगी पक्ष्यांना पाहण्याची, त्यांचा अभ्यास करण्याची आणि त्यांच्या संवर्धनासाठी योगदान देण्याची ही एक सुवर्णसंधी आहे.

स्थानिक पक्ष्यांसोबतच स्थलांतरित पक्ष्यांच्या संरक्षणाची जबाबदारीही स्थानिक नागरिकांची आहे. त्यामुळे या सप्ताहात आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थी, सामाजिक संघटना, पक्षी अभ्यासक तसेच सामान्य नागरिकांनी मागील वर्षाप्रमाणे यावर्षीही मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन इको-प्रो भद्रावतीतर्फे करण्यात आले आहे.

उद्घाटनप्रसंगी इको-प्रोचे तालुका अध्यक्ष संदीप जीवने, किशोर खंडाळकर, अमोल दौलतकर, मंगेश पडाल, अभी लोहकरे, हनुमान घोटेकर, निलेश ठाकरे, सौ. प्रगती जीवने, सौ. कल्पना बांदुरकर, पतंजली योग समितीचे अनंता मते तसेच समितीचे संपूर्ण सदस्य उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये