बलिप्रतिपदा व गयगोधान (गोवर्धन पुजा) दिनविशेष

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती :_ तालुक्यातील जवळच असलेल्या निंबाळा, घोट, हेटी व चालबर्डी या चार गावांच्या सीमेवर बलिप्रतिपदेला गायगोधन ( गोवर्धन पुजा ) व ढाल पुजा करण्यात येते. ऐतिहासीक व सांस्कृतिक वारसा लाभलेली ही गायगोधन व ढाल पुजा येथील आदिवासी गोंड गोवारी जमाती तर्फे आजही तितक्याच श्रध्देने व पारंपारिक पध्दतीने साजरी केली जाते. यंदा मंगळवारी बलिप्रतिपदेला या गायगोधन व ढाल पुजेचे आयोजन करण्यात आले आहे.
परिसरातील चपराडा, चालबर्डी, घोट, निंबाळा, हेटी, लोणारा (गोंड), लोणारा (पारखी), कचराळा, चपराडा, मानोरा, मोहबाळा व ईतर अशा जवळपास १० ते १२ गावांमधील कोपाल (गायी राखणारा) आपल्या गायी गायगोधन पुजेसाठी याठिकाणी घेवून येतात.
*अंदाजे चारशे वर्षांपेक्षाही जुनी असलेली व सांस्कृतिक वारसा लाभलेली परंपरा आजही तितक्याच भक्तिभावाने सुरू आहे असे जाणकार सांगतात.
गायी राखणे हा गोंड गोवारी जमातीच्या लोकांचा पारंपारिक व्यवसाय असल्याने हे लोक गायींची तितक्याच भक्तिभावाने पूजा करून तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात.
दिपावलीच्या चौथ्या दिवशी बलिप्रतीपदेला गायगोधन व ढाल पूजेचा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी सकाळी घरी गायींची पूजा केली जाते. त्यानंतर सार्वजनीक पुजेसाठी गायींना गायगोधनाचे पटांगणावर आणले जाते.
या पटांगणावर साधारणत: पंचवीस ते तीस टोपले शेणापासुन एक मोठी भुरसी बनविण्यात येते. गायगोधन पुजेमध्ये या भुरसीला अनन्यसाधारण महत्व आहे. या भुरसीमध्ये एक अंडे व कोंबडीचे लहान जिवंत पिल्लू ठेवण्यात येते. पिलाचे धड शेणामध्ये दाबलेले असते व मानेचा भाग खुला ठेवण्यात येतो. तसेच अंदाजे एक फुटाच्या अकरा काड्यांचे अंडे व पिल्लाच्या सभोवती कुंपण करण्यात येते. या काड्या पाच प्रकारच्या झाडांच्या असतात. यावर गुलाबी रंगाची रिबीन गुंडाळून एखाद्या सुवासिनीची ओटी भरतात त्याप्रमाणे खणा नारळाने भुरसीची ओटी भरण्यात येते.
यावेळी आदिवासी गोंड गोवारी जमातीतील लोक जमातीचे दैवत असणाऱ्या ढालीचे पुजन करतात. वीस ते पंचवीस फूट लांबीच्या काठीवर लाकडी पाटा बसवुन ढाल तयार केली जाते. यात एक ढाल ही चार मुखी जी माता रायताड जंगो चे प्रतीक अर्थात स्त्री रुपाची असते,तर दुसरी ढाल ही दोन मुखी जी धर्मगुरू पहांदि पारी कुपार लिंगो चे प्रतिक अर्थात पुरुष रुपाची असते.
वरील प्रमाणे दोन्ही ढालीला आश्विन दशमीला गोंगो(पुजा) करून आखरावर जिथे गायगोधन तयार करून खिल्ला मुठवा पेन ची पुजा करतात. तसेच जेव्हा हिंदू धर्मामध्ये लक्ष्मी पुजन होते त्याच्या पहिल्या दिवशी आदिवासी गोंड गोवारी जमातीमध्ये महिषासुर(बोदालपेन)/भेसासुर, खैरदाई/मातामाय, ठाकूर देव या देवी देवतांची आणि आपल्या पूर्वजांची जे की पेनकारण (उतरण) केलेले पूर्वज यांची मुठपुजा करून गावातील गायींना गोधनावरून चालवून त्यांना खिल्ला मुठवा देवाचे दर्शन घडवण्याची परंपरा अनादी काळापासून चालत आलेली आहे, म्हणून या दिवशी एक उत्सव साजरा करण्याची परंपरा व रिवाज पडला आहे.म्हणून आजही आदिवासी गोंड गोवारी जमात माता रायताड जंगो व पहांदी पारी कुपार लिंगो च्या प्रतिकात स्त्री आणि पुरुष रुपात अर्थात (सल्ला व गांगरा) ढाली पुजतात.यांना जंगो लिंगो लाठी गोंगो असेही म्हणतात.तसेच आजच्या दिवसापासून आदिवासी गोंड गोवारी जमातीमध्ये देव माई हा धार्मिक मुठपुजा चा सण येईपर्यंत या दोन्ही ढाली ची मानता करण्यात येते.
यानंतर गायगोधन पुजेला सुरूवात होते. आदिवासी गोंड गोवारी जमातीच्या प्रथेनुसार आधी चारही गावांच्या शिवारांची (सीमेची) व शिवारामध्ये असलेल्या देवांची पूजा करण्यात येते. या पूजेला ‘शिव बांधणे’ असे म्हणतात. त्यानंतर पटांगणा शेजारी असलेल्या आदिवासी गोंड गोवारी जमातीचे आराध्य दैवत असलेल्या वाघोबाच्या मुर्तीची पुजा करण्यात येते. आदिवासी परंपरे नुसार पुजा करुन व नारळ फोडून भुरसीची पुजा करण्यात येते. यानंतर अंडे व जिवंत पिल्लू असणा-या भुरसीवरून कळपाने गायींना सोडण्यात येते. नंतर पिल्लू व अंडे भुरसीबाहेर काढण्यात येते. पण अंडे व पिल्लू यांना इजा झालेली नसते. अंडे व पिल्लू यांना इजा होऊच शकत नाही असा येथील लोकांचा दावा आहे.
आदिवासी गोंड गोवारी जमातीचे आणी गायगोधन व ढाल पुजेचे अस्तित्व अबाधित राखण्यासाठी दरवर्षी बलिप्रतिपदेला या ऐतिहासीक पुजेचे आयोजन करण्यात येते. मागील कित्येक वर्षांपासुन आदिवासी गोंड गोवारी जमातीला लाभलेला सांस्कृतिक वारसा, गायीचे व ढाल पुजनाचे महत्व गायगोधन व ढाल पुजेच्या माध्यमातून आपली सांस्कृतिक परंपरा जोपासत आहे.
अश्या प्रकारे विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यामध्ये गाय गोधन व ढाल पूजनाचा कार्यक्रम गावं स्तरावर व सामूहिक पद्धतीने आयोजित करून आपल्या संस्कृतीक परंपरेची जोपासना आदिवासी गोंड गोवारी जमाती कडून केल्या जाते.अनुसूचित जमातीच्या यादीत क्रमांक 18 वर असलेल्या आदिवासी गोंड गोवारी जमातीच्या सांस्कृतिक व पारंपारिक प्रथेची माहिती जिल्यातील व विदर्भातील लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांना व्हावी व या आदिवासी गोंड गोवारी जमातीला अनुसूचित जमाती चे प्रमाणपत्र मिळण्याकरिता येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी आदिवासी गोंड गोवारी जमातीला लाभलेला सांस्कृतिक वारसा व परंपरा यांचे शासकीय अधिकाऱ्यांनी अवलोकन करून या जमातीला अनुसूचित जमातीचे लाभ, अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमापत्र तसेच हे सर्व मिळण्या करिता ज्या अडचणी निर्माण झाल्या आहेत त्या दूर व्हाव्या याकरिता अधिकारी वर्गाने आमच्या आदिवासी सांस्कृतिक वारसा व परंपरेचे अवलोकन करून मार्ग सुकर करावा अशाप्रकारचे आवाहन आदिवासी गोंड गोवारी संस्कृती व कल्याण मंडळ जिल्हा चंद्रपूर चे उपाध्यक्ष श्री विलास राऊत यांनी केले आहे.



