ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चांदा पब्लिक स्कूलच्या खेळाडूंची राष्ट्रीय व राज्य क्रीडा स्पर्धेसाठी निवड

महाराष्ट्राचे करणार प्रतिनिधित्व!

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ चांदा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात मानाचे तुरे रोवले आहेत. शाळेतील आरोही नितीलकुमार रामटेके, सखी पांडुरंग दोरखंडे, दृष्टी विनोद ताजने आणि किंजल प्रेमकुमार भगत या खेळाडूंची राष्ट्रीय व राज्य स्तरावरील विविध क्रीडा स्पर्धांसाठी निवड झाली आहे. या यशामुळे चांदा पब्लिक स्कूलच्या क्रीडा क्षेत्रातील गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

आरोही नितीलकुमार रामटेके हिने क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय हॉलीबॉल स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. तिची राज्यस्तरीय शालेय हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड झाली. ही स्पर्धा २८ ते ३१ ऑक्टोबर २०२६ दरम्यान रत्नागिरी येथे पार पडली. यामध्येही तिने उल्लेखनीय कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावरील शालेय हॉलीबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळविला आहे.

सखी पांडुरंग दोरखंडे हिची ही विभागीय हॉलीबॉल स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर राज्यस्तरीय शालेय हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड झाली. ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२६ दरम्यान कोल्हापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत तिने आपल्या खेळाची चमक दाखवत राष्ट्रीय स्तरावरील शालेय हॉलीबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात स्थान मिळविले. ही राष्ट्रीय स्पर्धा शिर्डी येथे होणार आहे.

तसेच दृष्टी विनोद ताजने हिनेही कुस्ती क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले. पुणे येथील सिंहगड पब्लिक स्कूल, लोणावळा येथे २२ ते २४ ऑक्टोबर २०२६ दरम्यान झालेल्या सी.बी.एस.ई. गेम्स कुस्ती स्पर्धेत १७ वर्षांखालील ५० किलो वजन गटात तिची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली. आता ३१ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०२६ दरम्यान छत्रसाल स्टेडियम, मॉडेल टाउन, दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ती सहभागी होणार आहे.

त्यासोबतच जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुल चंद्रपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या विभागीय मैदानी क्रीडा स्पर्धा (लांब उडी आणि तिहेरी उडी) स्पर्धेत किंजल प्रेमकुमार भगत या खेळाडूची निवड राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी झालेली आहे.

या विद्यार्थिनींच्या यशाबद्दल चांदा पब्लिक स्कूलच्या संचालिका श्रीमती स्मिता संजय जिवतोडे, प्राचार्या आम्रपाली पडोळे, शिक्षकवृंद व क्रीडा विभागाने त्यांचे भरभरून अभिनंदन केले असून आगामी राष्ट्रीय व राज्य स्तरीय स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये