मिलियन्स स्टील कंपनीविरोधात मजूर व ग्रामस्थांचा एल्गार
कामगारांना पूर्वसूचना न देता कामावरून कमी केल्याचा आरोप : महिला ग्रामस्थांना धमकी, पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती :_ तालुक्यातील मुरसा परिसरात कार्यरत असलेल्या मिलियन्स स्टील प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या व्यवस्थापनाकडून मजूर व ग्रामस्थांवर अन्याय होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी अन्यायग्रस्त मजूर व ग्रामस्थांनी ६ नोव्हेंबर रोजी भद्रावती येथील वृंदावन सभागृहात पत्रकार परिषद घेऊन आपली व्यथा मांडली. कंपनी व्यवस्थापनाच्या कथित मनमानी कारभाराची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि अन्यायग्रस्तांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ नोव्हेंबर २०२५ रोजी ग्रामपंचायत मुरसा यांच्या मासिक सभेत कंपनीला देण्यात आलेले ना-हरकत प्रमाणपत्र ग्रामसभेत रद्द करण्यात आले होते. मात्र, असे असतानाही कंपनीचे काम सुरूच असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
कंपनीत कार्यरत असलेल्या मुरसा गावातील तीन स्थानिक युवकांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी करण्यात आले. कामावरून कमी करण्याचे ठोस कारणही सांगण्यात आले नाही. त्यामुळे संबंधित युवकांना पुन्हा कामावर रुजू करून घ्यावे, अशी प्रमुख मागणी ग्रामस्थांनी केली.
दरम्यान, कंपनीचे प्रोजेक्ट हेड राय, एच.आर. विभागाचे नाईक आणि सुरक्षा प्रमुख यादव यांनी ग्रामस्थांना, विशेषतः महिलांना, शिवीगाळ केली. तसेच महिलांचे हात पकडून मारहाणीची धमकी दिल्याचा गंभीर आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला. या प्रकाराविरोधात घुग्घुस पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही, असा आरोपही करण्यात आला.
उलट कंपनीच्या बाजूने करण्यात आलेल्या चुकीच्या तक्रारींच्या आधारे ग्रामस्थांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच आपली तक्रार नोंदविण्यासाठी पोलीस ठाण्यात जाणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून दडपशाही केली जात असल्याचा आरोपही पत्रकार परिषदेत करण्यात आला.
या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ प्रशासनाने निष्पक्ष चौकशी करावी, कंपनी व्यवस्थापनाच्या मनमानी कारभाराला आळा घालावा, कामावरून कमी केलेल्या युवकांना पुन्हा कामावर घ्यावे, महिला व ग्रामस्थांना धमकावणाऱ्या संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. प्रशासनाने कंपनीची बाजू ऐकण्याबरोबरच अन्यायग्रस्त मजूर व ग्रामस्थांची बाजूही ऐकून त्यांना न्याय द्यावा, असे आवाहन पत्रकार परिषदेत करण्यात आले.
पत्रकार परिषदेला इंजि. जगदीश लवाडिया, ज्योती आसमल्लीवार, तेजस्विनी झोडे, राजकुमार पारसे, अक्षय डूडूरे, गौरव ठावरी, नंदकिशोर येरणे, राहुल पारखी आणि ज्योती कामतवार यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.



