‘अड्याळ टेकडीवरील विपश्यना केंद्र देशातील नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनविणार’ – आ.विजय वडेट्टीवार
थायलंडच्या ११० बौद्ध भिक्खूंच्या उपस्थितीत धम्म सोहळा; भिक्खूंच्या हस्ते वृक्षारोपण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रम्हपुरी :_ तालुक्यातील अड्याळ टेकडीवरील निर्माणाधीन विपश्यना केंद्र इतके भव्य, सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण बनविणार की, देशाच्या कानाकोपऱ्यातील नागरिकांनी ते पाहण्यासाठी ब्रम्हपुरीत यावे, असा माझा संकल्प आहे. हे केंद्र केवळ ध्यानधारणेचे ठिकाण न राहता बुद्धविचार, शांती आणि करुणेचा संदेश देणारे देशपातळीवरील महत्त्वपूर्ण केंद्र व्हावे, अशी आपली भूमिका असल्याचे विधानमंडळ काँग्रेस पक्षनेते, आमदार विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
अड्याळ टेकडी येथे थायलंडमधील ११० बौद्ध भिक्खूंच्या उपस्थितीत आयोजित धम्म सोहळ्यादरम्यान व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधताना त्यांनी हा संकल्प व्यक्त केला.
भगवान गौतम बुद्धांच्या शांती, करुणा, मैत्री आणि बंधुतेचा संदेश जनमानसात पोहोचविण्याच्या उद्देशाने या धम्म सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. थायलंडमधील फ्रा अजह्न जारण, फ्रा महा चेतसादा आणि फ्रा अजह्न विचाई यांच्यासह ११० बौद्ध भिक्खू या सोहळ्यात सहभागी झाले होते. त्यांच्या उपस्थितीत धम्मदेसना, सुत्त पठण, मैत्री संदेश आणि शांती प्रार्थना पार पडली.
काही अपरिहार्य कारणांमुळे आमदार विजय वडेट्टीवार यांना या कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहता आले नाही. मात्र, त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे उपस्थित बौद्ध भिक्खूंचे स्वागत करून त्यांच्या आगमनाबद्दल आभार व्यक्त केले. अड्याळ टेकडी येथे निर्माणाधीन असलेले विपश्यना केंद्र हे धम्मविचारांचा प्रसार करणारे महत्त्वपूर्ण केंद्र ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या धम्म सोहळ्याचे औचित्य साधून बौद्ध भिक्खूंच्या हस्ते विपश्यना केंद्र परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. निसर्ग संवर्धनाचा संदेश देतानाच बुद्धांच्या करुणा, मैत्री आणि शांततेच्या विचारांचा प्रसार करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
अड्याळ टेकडीवरील विपश्यना केंद्र केवळ स्थानिक पातळीवर मर्यादित न राहता देशभरात ओळख निर्माण करणारे असावे, यासाठी त्याची उभारणी दर्जेदार आणि आकर्षक स्वरूपात करण्यात येणार आहे. देशातील नागरिकांनी हे केंद्र पाहण्यासाठी ब्रम्हपुरीत यावे, एवढे सुंदर केंद्र उभारण्याचा आपला मानस असल्याचे विधीमंडळ काॅंग्रेस पक्षनेते, आमदार विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.



