ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी आतापासूनच प्रभावी नियोजन करा – जिल्हाधिकारी पंत

धानाची कापणी यंत्राऐवजी मनुष्यबळाद्वारे करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करा

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात जनावरांना चाऱ्याची टंचाई भासू नये, यासाठी आतापासूनच व्यापक आणि प्रभावी नियोजन करणे आवश्यक आहे. विशेषतः धान कापणीनंतर उपलब्ध होणारे तणीस वाया जाणार नाही, याची दक्षता घेऊन त्याचा जनावरांच्या चाऱ्यासाठी जास्तीत जास्त उपयोग करावा. यासाठी शेतकऱ्यांनी हार्वेस्टर यंत्राऐवजी शक्यतो मनुष्यबळाद्वारे धानाची कापणी करण्यास प्राधान्य द्यावे. तसेच चारा उत्पादन, संवर्धन आणि साठवणुकीसाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिले.

जिल्ह्यातील संभाव्य चारा टंचाईच्या अनुषंगाने चारा उत्पादन व व्यवस्थापनाच्या नियोजनाबाबत आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, उपजिल्हाधिकारी संजय पवार, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुरेश कुंभरे, मृद व जलसंधारण अधिकारी नीलिमा मंडपे, विभागीय वन अधिकारी राजन तलमले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी वसुमना पंत म्हणाल्या की, हार्वेस्टर यंत्राद्वारे धानाची कापणी केल्यास मोठ्या प्रमाणात तणीस शेतातच राहते किंवा त्याचा चाऱ्यासाठी पुरेसा उपयोग होत नाही. मात्र मनुष्यबळाद्वारे कापणी केल्यास तणीस व्यवस्थित गोळा करून जनावरांसाठी चारा म्हणून वापरता येते. त्यामुळे शेतकऱ्यांना दोन्ही पद्धतींमधील फरक प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे समजावून सांगावा.

यासाठी प्रायोगिक तत्त्वावर पाच गावांची निवड करून जनजागृती उपक्रम राबवावेत. त्यानंतर प्रत्येक तालुक्यातील किमान दहा गावांमध्ये कृषी, पशुसंवर्धन, महसूल, ग्रामविकास व वन विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे शेतकरी व पशुपालकांना मार्गदर्शन करावे.

पुढे त्या म्हणाल्या, उपलब्ध चाऱ्याचा अपव्यय टाळण्यासाठी कडबाकुट्टी यंत्रांचा अधिकाधिक वापर करण्यावर भर द्यावा. विदर्भ-मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पांतर्गत जास्तीत जास्त शेतकरी व पशुपालकांना विद्युतचलित कडबाकुट्टी यंत्रांचा लाभ मिळवून द्यावा.

कमी पाण्यात चारा उत्पादनासाठी हायड्रोपोनिक पद्धतीने मका चारा निर्मितीला प्रोत्साहन द्यावे. विशेषतः पाण्याची मर्यादित उपलब्धता असलेल्या पशुपालकांना या तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवून त्याचे फायदे समजावून सांगावेत. आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षण आणि दृकश्राव्य माध्यमांच्या साहाय्याने चारा उत्पादनाबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये