ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पिंपळगाव–नांदा रस्त्याच्या दुरुस्तीतील निकृष्ट कामावर संताप

पूर्वीच्या बोगस कामातूनही धडा नाही; अभियंत्यांच्या संगनमतामुळेच निकृष्ट कामाला खतपाणी?

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

नांदा फाटा :- कोरपना तालुक्यातील पिंपळगाव–नांदा रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामात पुन्हा एकदा निकृष्ट दर्जाच्या कामाचा प्रकार समोर आल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. यापूर्वी याच मार्गावरील कामांमध्ये झालेल्या कथित बोगसपणातून जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणताही धडा घेतलेला दिसत नसून, अभियंत्यांच्या पाठबळामुळेच कंत्राटदारांकडून निकृष्ट कामे केली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे.

बोरकुटे यांच्या शेताजवळ सुमारे वर्षभरापूर्वी बांधण्यात आलेल्या छोट्या पुलावरील सिमेंट काँक्रीटचा रपटा अवघ्या एका वर्षातच पूर्णतः उखडून खराब झाला आहे. नव्याने बांधलेल्या कामाची एवढ्या कमी कालावधीत झालेली दुरवस्था ही संबंधित कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. सार्वजनिक निधीतून उभारण्यात आलेली कामे इतक्या लवकर खराब होत असतील, तर कामाची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांनी नेमके काय केले, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत

दरम्यान, पिंपळगाव–गडचांदूर रस्त्याचे दुरुस्तीचे काम सुमारे चार महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले होते. या कामात तर चक्क गवत आणि माती न काढता त्यावरच गिट्टी टाकून रस्ता तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. पिंपळगाव येथील नागरिकांनी तीव्र आक्षेप घेत तक्रार केल्यानंतर संबंधित कामात काही प्रमाणात दुरुस्ती करण्यात आली. मात्र, सुरुवातीपासूनच निकृष्ट काम करण्याचा प्रयत्न झाल्याने कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत संशय अधिक गडद झाला आहे.

या प्रकारांमुळे कमिशनमुळेच अशी बोगस कामे होत आहेत काय?” असा सवाल उघडपणे उपस्थित केला जात आहे. सार्वजनिक विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात कमिशनखोरी आणि संगनमत असल्याशिवाय अशा प्रकारचे निकृष्ट काम वारंवार होणे शक्य नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.

पिंपळगाव–नांदा रस्त्यावरील दुरुस्तीच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून कामाचा दर्जा तपासण्यात यावा, दोषी कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे तसेच कोरपना येथील जिल्हा परिषद बांधकाम उपविभागातील संबंधित अभियंता आणि कामावर देखरेख ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.

“करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी करून निकृष्ट दर्जाची विकासकामे करणाऱ्यांवर कारवाई होणार की पुन्हा एकदा चौकशीच्या नावाखाली प्रकरण दाबले जाणार?” याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

 (रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामांमध्ये कुठलीही साफसफाई न करता चक्क मातीवरच गिट्टी टाकून काम सुरू आहे. बोगस काम करण्यात येत असल्याने रस्ता अल्पावधीतच खराब होणार :- पंकज लिहितकर नांदा)

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये