पोलीस अधीक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल यांची पोलीस ठाणे अल्लीपूर व वडनेर येथे आकस्मिक भेट
कर्मचारी समस्या, नवीन कायदे व मुद्देमाल निर्गतीचा घेतला सखोल आढावा..
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल यांनी पोलीस ठाणे अल्लीपूर आणि पोलीस ठाणे वडनेर येथे अचानक (आकस्मिक) भेट देऊन पोलीस ठाण्याच्या दैनंदिन कामकाजाची व अभिलेखांची सखोल पाहणी केली, या आकस्मिक भेटीदरम्यान माननीय पोलीस अधीक्षक यांनी पोलीस ठाण्यातील विविध विभागांची पाहणी केली.
पोलिस अधीक्षक यांनी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या सेवेशी संबंधित समस्या व वैयक्तिक अडीअडचणी जाणून घेतल्या. कर्मचाऱ्यांना तणावमुक्त वातावरणात काम करता यावे यासाठी आवश्यक त्या सुविधा पुरविण्याबाबत सूचना दिल्या. देशात लागू झालेल्या नवीन कायदे – भारतीय न्याय संहिता (BNS), भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) आणि भारतीय साक्ष अधिनियम (BSA) याबाबत उपस्थितांना माहिती देऊन कायदेशीर व तांत्रिक मार्गदर्शन केले. गुन्ह्यांच्या तपासात नवीन कायद्यातील तरतुदींचा काटेकोर वापर करण्याचे निर्देश दिले.
पोलीस ठाण्यात प्रलंबित असलेल्या जप्त मुद्देमालाच्या निर्गतीचा सविस्तर आढावा घेतला. या अंतर्गत न्यायालयाच्या परवानगीने मौल्यवान व किमती मुद्देमाल (दागिने, वाहने, रोख रक्कम इत्यादी) मूळ तक्रारदारांना लवकरात लवकर परत करण्याच्या आणि उर्वरित मुद्देमालाची तात्काळ निर्गती करण्याच्या सूचना दिल्या.
दोन्ही पोलीस ठाण्यांमधील प्रलंबित गुन्ह्यांचा सखोल आढावा घेऊन गंभीर गुन्ह्यांचा लवकरात लवकर तपास पूर्ण करणे, आरोपींना तात्काळ अटक करणे आणि न्यायालयात वेळेत दोषारोपपत्र दाखल करण्याचे निर्देश दिले.
पोलीस ठाण्यात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना सन्मानजनक वागणूक मिळून त्यांच्या समस्यांचे जलद निवारण व्हावे, यासाठी वर्धा पोलीस दल सदैव तत्पर आहे, असा पुनरुच्चार मा. पोलीस अधीक्षक यांनी या वेळी केला,



