स्वस्त धान्य दुकानात धान्याची अफरातफर…!
वढोलीतील दुकानातून १२.५० क्विंटल धान्याची तफावत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
चौकशी अहवाल जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे ; गुन्हा दाखल न झाल्याने कारवाईवर प्रश्नचिन्ह
गोंडपिपरी :_ तालुक्यातील वढोली येथील गुरुदेव सेवा मंडळाच्या नावे असलेल्या स्वस्त धान्य दुकानातील कथित धान्य अफरातफरीचे प्रकरण आता जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पोहोचले आहे. अन्नपुरवठा विभागाच्या चौकशीत तब्बल १२.५० क्विंटल अन्नधान्याची तफावत आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या प्रकरणात अद्याप पोलिसांत गुन्हा दाखल न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
गेल्या दोन-तीन महिन्यांपासून वढोली येथील स्वस्त धान्य दुकानातून पात्र लाभार्थ्यांना धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत होत्या. दुकानाचे कामकाज गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी विश्वनाथ चूधरी यांच्यामार्फत सुरू होते. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत तहसीलदार शुभम बाहकर यांनी अन्नपुरवठा विभागाला चौकशीचे आदेश दिले.
२० ऑगस्ट २०२६ रोजी प्रशासनाने वढोली येथे तपासणी केली. तहसीलदार शुभम बाहकर, नायब तहसीलदार अरविंद चांदेकर, पुरवठा निरीक्षक शैलेंद्र झोडापे, मंडळ अधिकारी सुकेसनी कांबळे, ग्राम महसूल अधिकारी शेळके यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. चौकशीनंतर दुकानातील धान्यसाठ्यात १२.५० क्विंटलची तफावत आढळल्याचे सांगण्यात आले. याबाबतचा चौकशी अहवाल पुढील कार्यवाहीसाठी चंद्रपूर जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला असून, मार्गदर्शन मागविण्यात आले आहे.
दरम्यान, संबंधित स्वस्त धान्य दुकान निलंबित करून त्याचे धान्य वितरण गणेशपिपरी येथील देवराव चापले यांच्या दुकानाशी जोडण्यात आल्याची माहिती आहे.
*प्रशासकीय कारवाईपलीकडे पुढे काय?*
धान्याची अफरातफर चौकशीतून सिद्ध होत असल्यास जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. केवळ दुकान निलंबित करून प्रकरण थंडबस्त्यात टाकले जाणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. जिल्हा पुरवठा विभागाच्या पुढील निर्णयाकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.



