ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली पिकांची पाहणी.

एलनिनोच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्याचे निर्देश ; सोयाबीन पिकाची पाहणी व शेतकऱ्यांनी संवाद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा : एलनिनोच्या प्रभावामुळे यावर्षी पर्जन्यमान तुलनेने बरेच कमी झाले आहे. सिंचन प्रकल्पांमध्ये देखील पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. परिस्थिती अशीच राहिल्यास दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी आज स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिक परिस्थितीची पाहणी केली व आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

आर्वी तालुक्यातील खरांगणा येथे प्रत्यक्ष बांधावर जात पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी सोयाबीन पिकांची पाहणी केली. यावेळी आमदार सुमित वानखेडे, उपविभागीय अधिकारी विश्वास सिरसाठ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरविंद उपरीकर, सुनिल गफाट, अशोक कलोडे, माजी सरपंच निलिमा अक्कलवार, माजी उपसरपंच राजेश अवथळे, मंडळ अधिकारी अनिल जगताप तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्र्यांनी प्रत्यक्ष सोयाबीन पिकात जाऊन पाहणी केली. गेल्या महिन्यात तब्बल २० दिवस पावसाचा खंड पडला. या महिन्यात देखील पावसाचा खंड असल्याने सोयाबीनच्या शेंगा भरलेल्या नाही. हातचे पिक जाण्याची शक्यता आहे. सोयाबीन झालेच तर सरासरी उत्पन्न फार कमी असेल, अशी खंत शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केली. शेतकऱ्यांचे म्हणणे, त्यांच्या भावना पालकमंत्र्यांनी आत्मियतेने जाणून घेतल्या. काही शेतकऱ्यांनी जंगली जनावरांचा मोठ्या प्रमाणावर त्रास असल्याने त्यावर वनविभागाच्या माध्यमातून उपाययोजना करण्याची मागणी केली.

गेल्या महिन्यात आणि या महिन्यात देखील पावसाचा खंड झाल्याने तसेच अपेक्षित पाऊस नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. कापूस, सोयाबीनच्या सरासरी उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच सर्व संबंधित विभागांना आवश्यक सुचना केल्या आहे. आपण देखील सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आवश्यक सुचना केल्या. कृषी आणि महसूल विभागास पंचनामे करुन अहवाल शासनास सादर करण्याच्या सुचना केल्या असल्याचे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यावेळी बोलतांना म्हणाले.

राज्य शासन कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांचा कर्जाचा भार कमी करण्यासाठी अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना शासनाने आणली. जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे. एलनिनोमुळे कमी पर्जन्यमान होऊन नुकसान सोसावे लागल्यास निश्चितच शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम शासन करेल, असे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यावेळी म्हणाले. यावेळी आमदार सुमित वानखेडे यांनी देखील शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये