श्री संत झिंगुजी महाराज गणेश मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने श्री संत झिंगुजी महाराज गणेश मंडळ, भद्रावती यांच्या वतीने श्री संत झिंगुजी महाराज देवस्थान (मठ) येथे शनिवार, १९ सप्टेंबर रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या शिबिरात नागरिकांची रक्तदाब (बीपी) तसेच रक्तातील साखरेची (शुगर) मोफत तपासणी करण्यात आली. विशेषतः ३० वर्षांवरील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. तपासणीदरम्यान आरोग्य कर्मचाऱ्यांनी नागरिकांना आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.
शिबिरासाठी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, भद्रावती यांचे सहकार्य लाभले. आरोग्य अधिकारी डॉ. मोनिका सुरपाम, स्टाफ नर्स श्रुती कदम, एन.पी.डब्ल्यू. सौरभ पिसे, ए.एन.एम. वनिता थूल तसेच आशा स्वयंसेविका संगीता नागपुरे, स्वाती दैवलकर, प्रतिभा राऊत व योगिता बुरडकर यांनी नागरिकांची आरोग्य तपासणी करून आवश्यक माहिती व मार्गदर्शन केले.
नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देत राबविण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले. ‘आपले आरोग्य, आपली जबाबदारी’ या संदेशातून नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व पटवून देण्यात आले. मंडळाच्या वतीने भविष्यातही विविध आरोग्य व सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी नगरसेवक गौरव नागपुरे, गोविंद रुयारकर, हर्षल पारशिवे, तुषार निमकर, आदित्य पिंपळकर, हर्षल निमकर, सचिन कामतवार व कार्तिक मांढरे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.



