ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाघाच्या दहशतीने दिवाळीआधीच फटाक्यांचा आवाज!

_गणेशपिपरी, चेकपिपरी, गोजोली परिसरात वन्यप्राण्यांचा वावर ; वनविभागाचा जंगलात न जाण्याचा इशारा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी  :_ तालुक्यातील गणेशपिपरी, चेकपिपरी आणि गोजोली परिसरात वाघ, बिबट्या व अस्वलासारख्या वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावालगतच्या जंगलात तसेच शेतशिवारात वन्यप्राण्यांच्या हालचाली वाढल्यामुळे शेतकरी, शेतमजूर आणि पशुपालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. वन्यप्राण्यांना दूर ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतात फटाके फोडण्यास सुरुवात केली असून, दिवाळीपूर्वीच परिसरात फटाक्यांचा आवाज घुमू लागला आहे.

गतवर्षी याच परिसरात वाघाने धुमाकूळ घातला होता. या घटनांमध्ये दोन बैलांचा बळी गेल्यानंतर वनविभागाने पथकासह परिसरात तळ ठोकून वाघाला दूर करण्यासाठी प्रयत्न केले होते. आता पुन्हा वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये जुन्या घटनांच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

एकीकडे पावसाच्या लहरीपणामुळे आणि दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतीचे नुकसान झाले आहे. हातात आलेले पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच वन्यप्राण्यांच्या भीतीने शेतात जाणेही धोकादायक ठरत आहे. त्यामुळे पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी फटाके फोडण्यासारखे उपाय करीत आहेत.

दरम्यान, वनपरिक्षेत्र झरण अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये वन्यप्राण्यांचा वाढता वावर लक्षात घेऊन वनविभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी एस. डी. मडावी यांनी १ नोव्हेंबर २०२६ रोजी संबंधित ग्रामपंचायतींच्या सरपंच व सचिवांना पत्र पाठवून ग्रामस्थांना जंगलात जाण्याबाबत मनाईच्या सूचना दिल्या आहेत.

गावांमध्ये दवंडीद्वारे तसेच मौखिक स्वरूपात सकाळी व सायंकाळी नागरिकांना जंगलात न जाण्याच्या सूचना द्याव्यात, असे पत्रात नमूद केले आहे. सरपण, गवत, लाकूडफाटा गोळा करण्यासाठी किंवा गुरे चारण्यासाठी जंगलात जाणे टाळावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

वाघ, बिबट्या आणि अस्वल यांसारख्या हिंस्र वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याने मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना घडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत नागरिकांसह पाळीव जनावरांच्या जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्य किंवा पाळीव जनावर जखमी अथवा मृत झाल्यास आर्थिक मदतीबाबत वनविभागाचे कार्यालय जबाबदार राहणार नसल्याचाही उल्लेख संबंधित पत्रात करण्यात आला आहे.

*शेतकरी दुहेरी संकटात*

शेतीचे नुकसान आणि वन्यप्राण्यांची दहशत अशा दुहेरी संकटाचा सामना गणेशपिपरी, चेकपिपरी व गोजोली परिसरातील शेतकऱ्यांना करावा लागत आहे. नागरिकांनी वनविभागाच्या सूचनांचे पालन करून जंगलात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात येत आहे. त्याचबरोबर वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी नियमित गस्त, संवेदनशील भागांत निगराणी आणि आपत्कालीन मदतीची व्यवस्था करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. नागरिकांची सुरक्षितता आणि वन्यजीवांचे संरक्षण यांचा समतोल राखण्यासाठी वनविभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये