किक बॉक्सिंगमध्ये स्किल डेव्हलपमेंट स्पोर्ट अकॅडमीचा डंका!
जिल्हास्तरीय स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी ; आठ खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
बुलडाणा जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि किक बॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धेत देऊळगाव राजा येथील स्किल डेव्हलपमेंट स्पोर्ट अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत यशाचा ठसा उमटवला. या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर अकॅडमीच्या आठ खेळाडूंची शालेय विभागीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी उज्ज्वला लाडगे यांच्या हस्ते झाले. यासाठी किक बॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्रचे अध्यक्ष निलेश शेलार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेले खेळाडू :
• १७ वर्षे मुली : अक्षरा डोईफोडे, स्वरूपा खांडेभराड, तारका जाधव.
• १७ वर्षे मुले : गौरव पाबळे, निळकंठ वारुळे.
• १९ वर्षे मुले : राघव झोरे, अरुण शिवरकर.
स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन व नियोजन बुलढाणा जिल्हा किक बॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष राजेश खांडेभराड, सचिव भूषण शिरसाट, क्रीडाधिकारी श्रीवास आणि क्रिडा अधिकारी जीवन मोहड यांनी केले.
स्किल डेव्हलपमेंट स्पोर्ट अकॅडमीच्या खेळाडूंनी मिळवलेल्या या यशामुळे देऊळगाव राजा शहराच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विभागीय स्पर्धेतही हे खेळाडू अशीच यशस्वी कामगिरी करतील, असा विश्वास क्रीडाप्रेमींनी व्यक्त केला आहे.

