मटका किंगच्या गाडीतून पाठलाग अन् चालकाला बेदम मारहाण!
ब्रम्हपुरीच्या माजी ठाणेदाराविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचे कोर्टाचे निर्देश
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रम्हपुरी :_ ‘तुम्हा लोकांचं इथं राज चालणार नाही, इथं आमचं राज चालणार!’ असा आव आणत खाजगी कपड्यात येऊन बस चालकाला शिवीगाळ करणे, डोक्यावर काठीने वार करून गंभीर जखमी करणे आणि नंतर पदाचा गैरवापर करत तक्रारही नोंदवून न घेणे… ब्रम्हपुरीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सुधाकर अंभोरे यांची हीच दादागिरी आता त्यांच्या चांगलीच अंगाशी आली आहे. माजी ठाणेदार अंभोरे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश मा. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दिल्याने पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे निष्पाप बस चालकाला अखेर न्यायाची आशा दिसू लागली आहे.
घटना आहे २६ नोव्हेंबर २०२३ ची. नागपूरचे ट्रॅव्हल्स चालक मोहन शालीकराम अडिवकर हे नेहमीप्रमाणे प्रवाशांना घेऊन गडचिरोलीवरून नागपूरच्या दिशेने निघाले होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास ब्रम्हपुरी रेल्वे फाटक बंद असल्याने गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. फाटक उघडताच गाड्या हळूहळू पुढे सरकत असताना, एक आकाशी रंगाची इनोव्हा कार (MH-29-AR-8855) चुकीच्या बाजूने (रॉंग साईड) सुसाट आली. त्या कारमधून साध्या कपड्यात उतरलेल्या एका इसमाने चालक मोहन अडिवकर यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत थांबण्याचा इशारा केला. प्रचंड गर्दी असल्याने “मी का थांबू?” एवढेच अडिवकर म्हणाले. एवढ्यावरून त्या इसमाचा पारद चढला आणि तो निघून गेला.
हा सगळा प्रकार तिथेच संपला नाही. बस पुढे ख्रिस्तानंद रुग्णालय चौकात पोहोचताच, तोच इसम तिथे आधीच ताटकळत उभा होता. चालक मोहन बसमधून खाली उतरत असतानाच त्याने थेट अंगावर धावून जात लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. एवढ्यावरच त्याचे मन भरले नाही, तर तिथे तैनात असलेल्या फिरोज पठाण या वाहतूक पोलिसाची काठी हातात घेतली आणि मोहन यांच्या पायावर व डोक्यावर सपासप वार केले. मारहाण इतकी भीषण होती की मोहन यांच्या डोक्यातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. नंतर समजले की मारहाण करणारा तो इसम दुसरा तिसरा कोणी नसून ब्रम्हपुरीचे ठाणेदार सुधाकर अंभोरे होते! डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने वेदनेने कळवळणारे मोहन उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात जाऊ देण्याची गयावया करत होते. पण ठाणेदार अंभोरे यांनी प्रवाशांना बसमधून खाली उतरवून दिले आणि रक्ताळलेल्या अवस्थेतच मोहन यांना बस चालवत पोलीस ठाण्यात आणायला भाग पाडले.
पोलीस ठाण्यात आणल्यावर चालक मोहन शालीकराम अडिवकर दारू पिल्याचा संशय घेऊन घेतलेली ‘ब्रेथ टेस्ट’ निगेटिव्ह आली. तसेच मोहन यांच्या मोबाईलमधील घटनेचे रेकॉर्डिंग आणि फोटो एका वाहतूक पोलिसाने बळजबरीने लॉक नंबर मागून डिलीट केले.उपचारासाठी खाजगी सेंटरमध्ये नेल्यावर सिटी स्कॅनच्या २५०० रुपयांची रक्कमही चालकालाच द्यावी लागली.
रात्री सर्व प्रकार घडल्यानंतर घाबरलेले मोहन अडिवकर तक्रार देण्यासाठी ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात गेले. मात्र, तिथे कर्तव्यावर असलेल्या पोलीस उपनिरीक्षक संघमित्रा बांबोळे आणि प्रशांत खोब्रागडे यांनी स्वतःच्याच वरिष्ठाची (ठाणेदार अंभोरे) पाठराखण करत लेखी तक्रार घेण्यास साफ नकार दिला.अखेर चालकाने उपविभागीय पोलीस अधिकारी, तसेच माजी मंत्री विजय वडेट्टीवार आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे दाद मागितली. या संपूर्ण प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. घटनेच्या दिवशी ठाणेदार अंभोरे ज्या इनोव्हा कारने चालकाचा पाठलाग करत आले होते, ती कार वणी (जि. यवतमाळ) येथील एका नामांकित वरली-मटका किंगची असल्याची चर्चा परिसरात रंगली होती. कायद्याचे रक्षकच जर मटका किंगच्या गाडीतून फिरत असतील, तर यामागे काय साटेलोटं आहे? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
पोलीस प्रशासनाने आपल्याच अधिकाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न केल्यानंतर, पीडित चालकाने अँडव्होकेट मार्फत न्यायालयात धाव घेतली. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ब्रम्हपुरी यांनी या अर्जाची गंभीर दखल घेत फौ.कि. अर्ज क्र. २८/२०२४ अन्वये अर्ज मंजूर केला आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC) कलम १५६(३) अन्वये तत्कालीन ठाणेदार सुधाकर अंभोरे यांच्यावर भारतीय दंड संहिता २९४, ३२४, ३४१,५०४ व महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 – १४५(२) कलमांखाली गुन्हा दाखल करून सखोल तपास करण्याचे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिले आहेत.



