ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अंतोरा येथील नव्याने लोकार्पण झालेली इमारत उत्तम आरोग्य केंद्र होईल – पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

अंतोरा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे लोकार्पण _ ७ कोटी खर्चून केंद्राच्या इमारतीचे बांधकाम, विविध सुविधा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा :_ ग्रामीण भागातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे, यासाठी केंद्रांना विविध प्रकारच्या सुविधा आपण उपलब्ध करून देत आहोत. अंतोरा येथे नव्याने बांधण्यात आलेली इमारत परिसरातील गावांसाठी एक उत्तम आरोग्य केंद्र ठरेल, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केले.

अंतोरा येथे ७ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री डॉ.भोयर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास खासदार अमर काळे, आमदार सुमित वानखेडे, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, आष्टीचे नगराध्यक्ष अनिल धोत्रे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्नील बेले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजसिंह पवार, उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाठ, जिल्हा परिषद बांधकामचे कार्यकारी अभियंता शुभम गुंडतवार आदी उपस्थित होते.

सर्वसामान्य नागरिकांना खाजगी रुग्णालयातील खर्चिक उपचार परवडण्यासारखा नाही. त्यामुळे सरकारी रुग्णालयांमध्येच उत्तम सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. कोरोना काळानंतर विविध प्रकारचे आजार बळावले आहे. सामान्य रुग्णांना दिलासा मिळावा यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आयुष्मान भारत योजना आणली. या योजनेतून ५ लाखांपर्यंतचे सर्व उपचार, शस्त्रक्रिया मोफत होतात. रुग्णांना नोंदणीकृत खाजगी रुग्णालयांमध्ये देखील उपचारांसाठी कोणत्याही प्रकारचा खर्च करावा लागत नाही, असे पालकमंत्री म्हणाले.

देशात सध्या एलनिनोचे संकट आहे. पुढे देखील पावसाचा खंड व जमिनीतील पाण्याची पातळी खालावण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या पार्श्वभूमीवर राज्यस्तरावरुन उपाययोजना करत आहे. आपण जिल्हास्तरावर उपाययोजना सुरू केल्या. शेतकऱ्यांनी देखील पिकनिहाय नियोजन करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी खंबीरपणे एलनिनोमुळे आपल्या पुढे असलेल्या संकटाचा सामना करावा, राज्य शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

*आरोग्य केंद्रस्तरावरच उत्तम सुविधा मिळाव्या : खा.अमर काळे*

अंतोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा परिसरातील गावांना चांगला फायदा होणार आहे. हे केंद्र अधिक उत्तमपणे कसे कार्यरत होईल, यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. बरेचदा छोट्या छोट्या गोष्टींसाठी रुग्णांना वरच्या रुग्णालयात रेफर केले जातात, असे होऊ नये. आरोग्य केंद्रातील सफाई कर्मचारी हे पद प्राधान्याने भरणे आवश्यक आहे. एलनिनोच्या पार्श्वभूमीवर शेत उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे आवश्यक आहे. जिल्ह्यात पिककर्ज योजनेची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, असे खा.अमर काळे म्हणाले.

*आरोग्य सुविधा उभारण्याच्या भर : आ.सुमित वानखेडे*

अनेक अडचणींचा सामना करत अंतोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीत प्रवेश होत आहे. याठिकाणी चांगली आरोग्य सेवा आता घडली पाहिजे. आर्वी मतदारसंघात उत्तम आरोग्य सुविधा निर्माण करण्यावर भर आहे. आर्वी येथे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय, तळेगाव येथे ३०० खाटांचे रुग्णालय साकारत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नुतनीकरणाचे काम आपण हाती घेतले आहे. पुढील वर्षापर्यंत मतदारसंघातील सर्व केंद्रांचे नुतनीकरण पूर्ण होईल. आरोग्य केंद्रातील रिक्त पदे पुढील वर्षापर्यंत भरली जातील. आष्टीचा आकांक्षित तालुका म्हणून समावेश झाल्याने प्रत्येक वर्षी अतिरिक्त ५ कोटींचा निधी तालुक्याला मिळणार असल्याचे आ.सुमित वानखेडे म्हणाले.

प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी केले. ७ कोटी खर्च करून अंतोरा आरोग्य केंद्राची इमारत उभी राहिली आहे. अंतोरा केंद्रांतर्गत २७ हजार नागरिक, २९ गावे व २२ ग्रामपंचायती आहे. इमारत कार्यरत व्हायला पाणी, रस्त्यांची मोठी अडचण होती. त्यावर मात करत इमारत रुग्ण सेवेत दाखल होत असल्याचे श्री.सोमण म्हणाले.

सुरुवातीस पालकमंत्री डॉ.भोयर व मान्यवरांनी नामफलकाचे अनावरण व फीत कापून रुग्णालय इमारतीचे लोकार्पण केले. त्यानंतर संपूर्ण इमारत व त्यातील सुविधांची पाहणी केली. यावेळी आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये